मंत्री गिरीश महाजन म्हणाले राऊतांचा मानसिक तोल बिघडला ; राऊत म्हणाले, अर्ध्या तासासाठी ईडी-सीबीआय ताब्यात द्या, फोडून दाखवतोच !
Minister Girish Mahajan remarked that Raut has lost his mental balance; Raut retorted, “Hand over the ED and CBI to me for half an hour, and I will certainly crack them open!” मुंबई (18 जून 2026) : राज्यातील ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली आहे. ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी अर्ध्या तासासाठी ईडी-सीबीआय आपल्याकडे दिल्यास सर्वात आधी गिरीश महाजनांना फोडतो,’ असा हल्लाबोल केला तर मंत्री महाजनांनीही खासदार राऊत यांचा मानसिक तोल बिघडल्याची टीका केली.
राऊत आक्रमक : म्हणाले फोडून काढतो
खासदार संजय राऊत म्हणाले की, नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदुत्वाच्या नावाने भ्रष्टाचार चाललाय. मी सगळं काढणार आहे,’ असा इशाराही राऊत यांनी दिला. आमचे खासदार फुटल्याची आवई उठवणार्यांनी आधी स्वतःची लायकी तपासावी, अशा तिखट शब्दांत राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ज्याला सत्ताधारी ‘ऑपरेशन टायगर’ म्हणत आहेत, ते प्रत्यक्षात ईडी, सीबीआय आणि पैशांच्या बळावर केलेले घाणेरडे राजकारण आहे. वाघाची कातडी पांघरल्याने कोणी वाघ होत नाही. निष्ठा विकून सत्तेच्या मागे जाणार्यांना जनता कधीही माफ करणार नाही. हा वाघांचा खेळ नसून लाचखोरांचा बाजार आहे.


तर दूध का दूध पाणी का पाणी होईल
राऊत यांनी महायुतीला थेट आव्हान दिले जर तुमच्यात एवढीच हिंमत असेल आणि तुमचे ‘ऑपरेशन’ इतकेच यशस्वी झाले असेल, तर फोडलेल्या लोकप्रतिनिधींचे राजीनामे घ्या आणि त्यांना पुन्हा जनतेच्या दारात उभे करा. निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत महायुतीमध्ये आहे का? जनताच ठरवेल की खरा वाघ कोण आणि पाळीव कोण! असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
राऊतांचा तोल बिघडला : मंत्री महाजन
संजय राऊत यांचा राजकीय आणि मानसिक तोल पूर्णपणे ढासळला आहे. ते कोणत्याही विषयावर, कोणाबद्दलही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. राऊतांची भाषा राजकारणाला न शोभणारी आहे,’ असे प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकममध्ये माध्यमांशी बोलताना दिले.
आई-बहिणींवरून शिवीगाळ केली
महाजन म्हणाले की, संजय राऊत यांचा राजकीय आणि मानसिक तोल पूर्णपणे ढासळला आहे. ते कोणत्याही विषयावर, कोणाबद्दलही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. कालपरवापर्यंत तर त्यांनी थेट आई-बहिणींवरून शिवीगाळ करण्यापर्यंत मजल मारली होती. लोकशाहीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची शिवराळ भाषा कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत महाजन यांनी आपला संताप व्यक्त केला.
बडबडीमुळेच पक्षाचा र्हास
महाजन पुढे म्हणाले की, राऊत यांच्याकडे सकाळी उठून नको ती बडबड करण्याशिवाय आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही. त्यांच्या याच अशा वर्तनामुळे आणि विधानांमुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे. पक्षाचा झालेला र्हास हा त्यांच्यामुळेच आहे. हे असेच सुरू राहिले तर आगामी काळात त्यांच्यासोबत साधे नगरसेवकही शिल्लक राहणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
कॅमेर्यासमोर बसून मागण्या किंवा आरोप करण्यापेक्षा जमिनीवर काम करा. किमान 17 जागांपैकी एखादी तरी जागा निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी मेहनत घ्या, उगीच नुसती वक्तव्ये करून वेळ वाया घालवू नका. महाजन यांच्या या थेट विधानामुळे आता ठाकरे गट आणि भाजपमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

