पी.एम.किसान लाभासाठी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई केवायसी करणे बंधनकारक


यावल (19 जून 2026) : यावल तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींना आता लाभाकरीता 30 जुनपूर्वीच वार्षिक ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मुदतीत ई केवायसी न केल्यास लाभ थांबणार आहे. वेळेत शेतकर्‍यांनी ई केवायसी करावी, असे आवाहन तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

डीबीटीद्वारे योजनेचा लाभ
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान) ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000/- इतकी आर्थिक मदत तीन समान हत्प्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थीना थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) द्वारे लाभ वितरीत करण्यात येत आहे. पी.एम.किसान अंतर्गत सर्व लाभार्थींसाठी मजबूत आणि सातत्यपूर्ण प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण लागू करण्यात आले आहे. पी.एम.किसान प्रणालीअंतर्गत सी. एस. सी. केंद्रांमार्फत बायोमॅट्रिक प्रमाणीकरण किंवा पी.एम. किसान मोबाईल अ‍ॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतीनी ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे.



आगामी हप्त्यासाठी केवायसी आवश्यक
पी.एम.किसान योजनेच्या आगामी हप्त्यासाठी पात्र खर्‍या लाभार्थीची वेळेत पात्रता सुनिश्चित करण्यासाठी आणि नियोजनबद्ध पद्धतीने 100 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चालू वर्षासाठीची वार्षिक ई-केवायसी 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पी. एम. किसान योजनेचा लाभ केवळ खर्‍या व जिवंत लाभार्थींपर्यंत पोहोचण्याकरता केंद्र शासनाने सर्व पी. एम. किसान लाभार्थींसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे.

पी.एम.किसान प्रणालीअंतर्गत सामायीक सुविधा केंद्र (सी. एस. सी.) केंद्रमार्फत बायोमॅट्रिक प्रमाणीकरण किंवा पी. एम. किसान मोबाईल अ‍ॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करावे.तसेच वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग अशा लाभार्थींना हालचाली संबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही अशा लाभार्थींनी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (व्ही. एन. ओ.) सहाय्यक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करून ई केवायसी पूर्ण करावी. सर्व पी. एम. किसान अंतर्गत लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी सी. एस. सी. केंद्रामार्फत बायोमॅट्रिक प्रमाणीकरण किंवा पी. एम. किसान मोबाईल अ‍ॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कुरबान तडवी, तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांच्याकडून करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !