भुसावळ तालुक्यात 1900 हेक्टर क्षेत्रावर धुळपेरणी

पाऊस नसल्याने शेतीमधील उगवण धोक्यात : शेतकर्‍यांपुढे ‘दुबार पेरणी’चे संकट


भुसावळ (20 जून 2026) : पावसाने ओढ दिली असतानाच दुसरीकडे भुसावळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी ‘धुळपेरणी’ला गती दिली आहे. आतापर्यंत तालुक्यातील तब्बल एक हजार 887 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे मात्र पावसाअभावी या पिकांची उगवण धोक्यात आली आहे तर शेतकर्‍यांवर भविष्यात दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवण्याची भीती आहे.

अल्प पाण्यावर पेरणी
भुसावळ तालुक्यातील तळवेल, वरणगाव, फुलगाव, पिंपळगाव, वेल्हाळे, वांजोळा आदी भागांमध्ये पाऊस नसतानाही किंवा विहिरी व कुपनलिकांना असलेल्या अल्प पाण्याच्या भरवशावर शेतकर्‍यांनी पेरणी सुरू केली आहे. तळवेल व परिसरात तर जिरायती क्षेत्रावरही मक्याची धुळपेरणी केली जात आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या भुसावळ तालुक्यात एकूण एक हजार 887 हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत बियाणे जमिनीत टाकण्यात आले. पाऊस न झाल्यास बियाण्याचा उगवण न होता बियाण्याचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. पाऊस न पडल्यास किंवा पेरणी केलेली पिके उगवली नाहीत, तर पुन्हा बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करावी लागणार आहे.




तर महागाचे बियाणे जाईल वाया
किमान 80 ते 100 मिमी पाऊस होत नाही, तोपर्यंत पीक पेरणी करणे आर्थिक नुकसानीचे ठरेल. सध्या धुळपेरणी केल्यानंतर पाऊस झाला नाही, तर महागाचे बियाणे वाया जावू शकते. अल्प पाऊस झाल्यास बियाण्यांची योग्य पध्दतीने उगवण होणार नाही. यामुळे नुकसान होई, असे प्रभारी तालुका कृषी अधिकारी ऋषिकेश चौधरी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !