हतनूर धरणाचे 22 दरवाजे उघडले : नागरिकांना सतर्कतेचा इशारा
धरणातील जलसाठा 74 टक्क्यांवर : सततच्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली
22 gates of Hatnur Dam opened : Alert issued to citizens. भुसावळ (4 जुलै 2026) : भुसावळ तालुक्यातील हतनूर प्रमुख प्रकल्पात संततच्या पावसाच्या जोरामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धरणात 74 टक्के जलसाठा झाल्यानंतर धरणाचे 22 दरवाजे एका मीटरने उघडण्यात आले आहे. धरणातून प्रति सेकंद 1404 क्यूमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
लाभ क्षेत्रात संततधार पाऊस
सूत्रांच्या माहितीनुसार, धरणाच्या लाभ व पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धरणाचे 22 रेडियल गेट प्रत्येकी एका मीटरने उघडण्यात आले. त्यातून 1404 क्युसेक्स (49,582 क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

याशिवाय कालव्याद्वारे 8.50 क्युसेक्स (300 क्युसेक्स) पाणी सोडण्यात येत आहे, तर आर.एस. गेटद्वारे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. शुक्रवारी दिवसभरात 28 मि.मी. पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पर्जन्यमान 76 मि.मी.पर्यंत पोहोचले आहे.
दरम्यान, धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे तापी नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
