संस्कार आणि परंपरा जपल्याशिवाय सुसंस्कारित समाजाची निर्मिती नाही : भुसावळात प्रभावती पाटील
श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाची व्याख्यानमाला ; भारतीय संस्कृतीतील सोळा संस्कारांचे महत्त्व विषद
भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या साप्ताहिक व्याख्यानमालेअंतर्गत संस्कार आणि परंपरा या विषयावर ज्येष्ठ लेखिका व व्याख्यात्या प्रभावती सुधीर पाटील यांनी भारतीय संस्कृतीतील संस्कार व परंपरांचे महत्त्व उलगडून सांगत, संस्कार आणि परंपरा हीच सुसंस्कारित समाजाची खरी ओळख असून त्यांच्या जतनातूनच आदर्श कुटुंब, सुदृढ समाज आणि सक्षम राष्ट्राची निर्मिती होते, असे प्रतिपादन केले.

सोमवार, 3 ऑगस्ट) रोजी सायंकाळी श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिभा फालक यांच्या रामनाम जपाने झाली. त्यानंतर विलास नेते यांनी विश्वकल्याण प्रार्थना सादर केली तसेच परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचे वाचन केले.
संघाच्या अध्यक्षा अलका ढाके व प्रमुख व्याख्यात्या प्रभावती सुधीर पाटील यांच्याहस्ते श्री अष्टभुजा मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्याख्यात्यांचा परिचय अलका ढाके यांनी दिला.
प्रभावती पाटील या ज्येष्ठ लेखिका असून त्यांनी खानदेशी पाककृती, बालसंस्कार, भुलाबाईंची गाणी, सुगरण, संस्कार आणि परंपरा तसेच विवाह संस्कार यांसह विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्या सकल लेवा संगम महिला मंडळाच्या उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत.
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात त्यांनी संस्कार आणि परंपरा या भारतीय संस्कृतीच्या परस्परपूरक मूल्यव्यवस्था असल्याचे सांगितले. संस्कारांची सुरुवात घरातून होत असून आई-वडील, शिक्षक, वडीलधारी मंडळी आणि समाज यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. परंपरा म्हणजे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संस्कृती, मूल्ये आणि जीवनदृष्टीचा होणारा वारसा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिंदू धर्मातील सोळा संस्कारांचे महत्त्व विशद करताना त्यांनी नामकरण, कर्णवेध, विवाह, कन्यादान, गणेशपूजन आदी संस्कारांची माहिती दिली. पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे हे संस्कार सहज जपले जात होते; मात्र विभक्त कुटुंबपद्धतीमुळे अनेक परंपरा आणि विधी नव्या पिढीपर्यंत पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही उणीव भरून काढण्यासाठी विविध संस्कार, परंपरा आणि धार्मिक विधींचे संकलन करून पुस्तके लिहिल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात अलका ढाके यांनी संस्कार आणि परंपरा या मानवी जीवनाला दिशा देणार्या मूल्यव्यवस्था असल्याचे सांगितले. त्यांच्यामुळे अहंकार कमी होऊन विनम्रता, अध्यात्म आणि चारित्र्य वृद्धिंगत होते तसेच सुसंस्कृत कुटुंब, समाज आणि राष्ट्रनिर्मितीस बळ मिळते, असे त्यांनी नमूद केले.
आभार दयानंद राणे यांनी तर पसायदान व राष्ट्रगीत अशोक निकम यांनी सादर केले. गजानन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे सचिव गजानन सेवलकर, विकास तोपरे, ज्ञानेश्वर गवाळे यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. छायाचित्रण प्रकाश ठाकूर यांनी केले.
