भुसावळात रेल्वे सल्लागार समितीची बैठक गाजली : रेल्वे स्थानकावरील पार्किंगचा ठेका संपूनही अवैध वसुलीचा दावा
बेकायदेशीर लूट आणि निकृष्ट अन्न विक्रीवर सदस्यांनी प्रशासनाला विचारला जाब
Bhusawal Railway Station Illegal Parking Fee Collection भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : भुसावळातील रेल्वे डीआरएम कार्यालयात बुधवार, 5 रोजी रेल्वे सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे स्थानकावर मिळणार्या निकृष्ट अन्न पदार्थांसह दुचाकी पार्किंगचा ठेका 23 जुलै रोजी संपलेला असतानाही अनधिकृतरित्या अवैध वसुली केली जात असल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. अवघ्या दहा मिनिटांच्या पार्किंगसाठी दहा रुपये उकळले जात असल्याने या प्रकाराकडे रेल्वे प्रशासन लक्ष देणार की ही अवैध वसुली अशीच सुरू राहणार, असा संतप्त सवाल रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

अवैध वसुलीच्या मुद्याने उडाली खळबळ
भुसावळ येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात बुधवारी दुपारी तीन वाजता विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची बैठक डीआरएम पुनीत अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या सुरुवातीला वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (सिनीयर डीसीएम) अजय कुमार यांनी प्रास्ताविक करून सर्व सदस्यांचे स्वागत केले व अधिकार्यांचा परिचय करून दिला.
अवैध पार्किंगच्या मुद्द्याने खळबळ
या बैठकीदरम्यान झेडआरयुसीसी व डीआरयूसीसी सदस्य अनिरुद्ध कुलकर्णी यांनी पार्किंगच्या अवैध लुटीचा मुद्दा लावून धरला. भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात असा बेकायदेशीर प्रकार सुरू असणे अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. रेल्वे स्थानक परिसरात बाहेरील निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणून विकले जात असून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे, यावर तत्काळ कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
वर्षभरातच रस्ते उखडले, चौकशीची मागणी!
डीआरएम कार्यालय ते रेल्वे शाळा आणि रेल्वे रुग्णालय या मार्गावरील रस्ते वर्षभरापूर्वीच तयार करण्यात आले होते मात्र अवघ्या एका वर्षातच हे रस्ते अत्यंत खराब झाल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे कर्मचार्यांची दररोज या मार्गाने मोठी वाहतूक असते. त्यामुळे या संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली मात्र रेल्वे प्रशासनाने हे रस्ते अद्याप चांगले असल्याचे सांगत उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला.
कॉर्ड लाईन सर्व्हे अन् जळगाव अपडाऊन करणार्यांसाठी दिलासा
भुसावळजवळील कॉर्ड लाईनजवळ नवीन प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी संयुक्त सर्व्हे अहवाल मुख्यालयाकडे पाठवण्यात आला असून लवकरच रेल्वे बोर्ड व मुख्यालयाकडून याची पाहणी होईल. याशिवाय, भुसावळ-नंदुरबार गाडी विलंबाने धावत असल्याने रोज जळगाव अपडाऊन करणार्या चाकरमान्यांचे हाल होतात, ही गाडी वेळेवर सोडण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तसेच शेगाव ते शिर्डी दरम्यान नवीन मेमू गाडी सुरू करावी, ज्यामुळे भाविकांची सोय होऊन रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल, अशी मागणी झाली.
मडगाव अन् पुण्याकरिता नवीन गाड्यांची मागणी
प्रवाशांच्या सुविधेसाठी भुसावळवरून दररोज संध्याकाळी मडगावसाठी (गोवा) नवीन रेल्वे गाडी सुरू करावी, अशी जोरदार मागणी बैठकीत करण्यात आली. याशिवाय, भुसावळहून पुण्याकडे जाणार्या काही गाड्या मनमाड, नाशिक, कल्याण मार्ग बदलून पनवेलमार्गे चालवाव्यात; जेणेकरून प्रवाशांना थेट पनवेल गाठता येईल. तसेच बर्हाणपूर स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची आग्रही मागणी सदस्यांनी लावून धरली.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाच स्थानकांचा विकास
बैठकीत अध्यक्षीय भाषणात बोलताना डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ विभागात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील 5 प्रमुख रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रवासी सुविधांचा विकास हा विभागाचा सर्वोच्च प्राधान्यक्रम असून, सदस्यांनी मांडलेल्या सर्व रास्त व योग्य मागण्यांवर लवकरात लवकर ठोस कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस प्रमुख अधिकार्यांसह सदस्यांची उपस्थिती
या 176 व्या बैठकीला अपर विभागीय रेल व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक, अपर विभागीय रेल व्यवस्थापक (तांत्रिक) एम. के. मीणा यांच्यासह विविध शाखांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. समितीचे सदस्य अनिरुद्ध कुलकर्णी, श्रीकांत सराफ, यशवंत जसूद, राजेश भराडे (भुसावळ), अशोक अग्रवाल (मलकापूर), जितेंद्र देशमुख (चाळीसगाव), श्रीमती माधुरी शर्मा (शेगाव), राजनारायण मिश्रा, उन्मेष मालू, नीरव वोरा (अकोला), पंकज नाटानी (बुरहानपूर), संजय सोनवणे, डॉ. यती पाटील (नाशिक), विजय मोहरीर (जळगाव), मनीष करवा (अमरावती), भूपेंद्र जैन (लासलगाव) आदी सदस्यांनी उपस्थित राहून आपापल्या क्षेत्रातील समस्या मांडल्या.
