रस्त्यांची अवस्था पाहून आपल्याला लाज वाटली ! पालकमंत्री हसन मुश्रीफांनी स्पष्टच सुनावले


नंदुरबार (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून आपल्याला लाज वाटली, अशा शब्दांत नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते उखडण्याचे कारण काय, असा सवाल करत संबंधित विभागाला जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

दर्जा राखण्याच्या सूचना
नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील विविध भागांतील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी रस्त्यांची झालेली दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आली. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि जिल्ह्याच्या विकासावर होणारा परिणाम लक्षात घेता त्यांनी प्रशासनाला रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जा राखण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

गुजरात सोडल्यानंतर रस्ता फारच खराब
रस्त्यांच्या परिस्थितीबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, आज बघितलं ते पाहून मी फार नाराज आहे. मला त्याची लाज वाटलेली आहे. मी सुरतवरून आलो. नागपूरच्या रस्त्याने आलो. गुजरात सोडल्याबरोबर आपल्या विभागातील रस्ता फारच खराब आहे. त्यानंतर श्रावणीला गेलो, तो रस्ताही खराब आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरून प्रवास करताना रस्त्यांच्या गुणवत्तेतील फरक स्पष्टपणे जाणवत असल्याचे मुश्रीफ यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. पावसाळ्याच्या काळात रस्त्यांची दुरवस्था आणखी वाढत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता का उखडतो?
रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवरही पालकमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते उखडत असतील तर संबंधित कामे किती दर्जेदार झाली, याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता का उखडतो? संबंधित विभागाला याचा जाब विचारणार, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. रस्त्यांची कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दर्जेदार झाली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तर अधिकार्‍यांना सोडलं नसतं
नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीची तुलना आपल्या कोल्हापूर जिल्ह्याशी करताना मुश्रीफ यांनी अधिक कठोर भूमिका मांडली. आपल्या रस्त्यांची प्रगती पाहता, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी परिस्थिती असती तर अधिकार्‍यांना सोडलं नसतं, ठेकेदारांनाही सोडलं नसतं, असे ते म्हणाले. रस्त्यांची कामे खराब होत असतील किंवा कामाचा दर्जा समाधानकारक नसेल, तर त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. केवळ निधी उपलब्ध करून देणे पुरेसे नसून त्या निधीतून होणार्‍या कामांचा दर्जा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !