शेतकर्यांना त्वरीत रासायनिक खतांचा पुरवठा करावा
बोदवड तहसीलदारांना शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
बोदवड : शेतकर्यांना त्वरीत रासायनिक खतांचा पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेद्वारा तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. शेतकर्यांना आता रासायनिक खतांची अत्यंत गरज असून जर खते वेळेवर मिळाली नाहीत तर शेतीच्या उत्पादनात घट होईल व शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास तोंडातून निघेल त्याचा शेतीला लागलेला खर्च सुद्धा निघणार नाही. शेतकर्यांची मका, ज्वारी, सोयाबीन, उडीद बाजरी ही कमी कालावधीची पिके घेतल्याने त्यांना खतांची नितांत गरज असल्याने सरकारने शेतकर्यांचा अंत पाहू नये, असे निवेदनात नमूद आहे.
तर तीव्र आंदोलनाचा इशारा
आठ दिवसात रासायनिक खते बोदवड येथे उपलब्ध झाली नाही तर शेतकरी संघटना कोरोनाच्या काळात सुद्धा शेतकर्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल व त्यास जबाबदार सरकार व शासकीय अधिकारी असतील, असा इशारा देण्यात आला आहे. शहरात खरोखर खताची टंचाई जाणवत असून तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी जातीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष दगडी शेळके, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांच्यासह प्रवीण मोरे, संतोष पाटील, नाना पाटील, महेंद्र पाटील, चंद्रकांत सपकाळ, विनोद गुरचळ, राजेंद्र कोळी, राहुल वाघ आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

