भुसावळात अज्ञात वाहनाने उडवल्याने युवकाचा मृत्यू
भुसावळ : शहरालगतच्या खडका चौफुलीवरील महामार्गावर रअज्ञात वाहनाने धडक दिल्याने शेख मुनीर मो. सलीम या युवक जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावर सुमारे वीस मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती.
अपघातग्रस्त वाहनाचा पोलिसांकडून शोध
खडका चौफुली वर रात्री 10.30 च्या सुमारास शेख मुनीर यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवक जागीच मरण पावला. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताचे वृत्त कळताच खडका रोड परीसरातील असंख्य नागरीकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, वाल्मीक सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. मृत युवकाचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये रवाना केला. अपघातग्रस्त वाहनाचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आला असून फेकरी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून पाहणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.

