बोदवडमध्ये खतांसाठी कृषी केंद्राबाहेर लागल्या रांगा


बोदवड : गेल्या अनेक दिवसांपासून बोदवडसह तालुक्यात युरीयासह इतर खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून खतांसाठी शेतकर्‍यांची सर्वदूर भटकंती होत आहे. गुरुवारी बोदवड शहरात मलकापूर रोडवरील एका कृषी केंद्रावर खते आल्यानंतर दुकान सुरू होताच शेतकर्‍यांचा रांगा लागल्या तसेच जामठी येथील एका कृषी केंद्रावर युरीयाचा ट्रक आल्यानंतरही तेथेही शेतकर्‍यांची झुंबड उडाली. सुमारे 250 च्या जवळपास शेतकर्‍यांनी या दुकानासमोर रांगा लावल्याचे चित्र होते. कृषी केंद्र चालकाकडून प्रत्येक शेतकर्‍यांच्या आधार कार्डच्या झेरॉक्सवर प्रति दोन बॅगचे वितरण करण्यात आले. गावातील सुमारे 170 जणांना युरीया खताचे वाटप करण्यात आले.अद्यापही सुमारे 70 शेतकरी खताच्या प्रतीक्षेतच आहे. गेल्या 26 जुलै रोजी गावातील एका कृषी केंद्रावर युरीया प्राप्त झाला होता त्या दिवशीही गोंधळ निर्माण झालेला होता. कुठलीही विपरीत घटना होऊ नये याकरीता बोदवड पोलिसांच्यावतीने या कृषी केंद्र चालकाच्या दुकानासमोर बंदोबस्त ठेवण्यात आला. सोशल डिस्टन्सला हरताळ फासत शेतकर्‍यांनी केलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रभाव आणखीन वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गावात लवकरच इतर खतांचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !