बोदवडमध्ये दोन दुकाने फोडली


वाढत्या चोर्‍यांमुळे व्यापार्‍यांमध्ये भीती : अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

बोदवड : शहरात एकाच रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने व्यापार्‍यांमध्ये भीती पसरली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. चोरट्यांनी धान्य दुकान व मोबाईल शॉपी फोडून 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी दोन्ही दुकानदाराकडून बोदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मध्यरात्री दोन दुकान फोडले
हर्षल विजय अग्रवाल (20) यांचे गौरीशंकर कॉम्प्लेक्समध्ये मयूर मोबाईल शॉपी असून शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडले. दुकानातील सात हजार 800 रुपये किंमतीचे सहा मोबाईल व सात हजार रुपये किंमतीचे हेडफोन, चार हजार रुपये किंमतीचे घड्याळ, पाच हजार रुपये किमतीचे आठ पेन ड्राईव्ह व एक हजारांची रोकड मिळून एकूण 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

धान्य दुकानालाही केले टार्गेट
दुसरी तक्रार राजमल खुबचांद अग्रवाल यांनी दिली. अग्रवाल यांच्या धान्य दुकानातून चोरट्यांनी मध्यरात्री दोन हजार रुपये किंमतीचे चिल्लर तसेच दोन हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल लांबवला. या प्रकरणी बोदवड पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉस्टेबल कालिचरण बिर्‍हाडे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !