मुक्ताईनगर मतदारसंघात एक कोटी 51 लाखांच्या विकासकामांना मंजुरी
सावदा : मुक्ताईनगर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मुक्ताईनगर मतदार संघात (रावेर विभाग) अनुसूचित 2515 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत लेखाशिर्ष 2019-2020 साठी एक कोटी 51 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश राज्याचे अपर सचिव यांनी जळगाव जिल्हा अधिकारी यांना दिला आहे.
या कामांना मिळाली मंजुरी
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत सुनोदा येथे बसस्थानक ते उदळी रस्त्याचे डांबरीकरण, मोठे वाघोदा बुद्रुक येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम, खिर्डी बुद्रुक येथे संतोष भंगाळे योगेश तेली यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण, खिर्डी बुद्रुक येथे अरुण चौधरी यांच्या घरापासून ते ऐनपुर रस्त्याचे काँक्रिटीकरण, वाघाडी येथे गावात पेव्हर ब्लॉक बसविणे, मंगलवाडी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे, तांदळवाडीत श्री दत्त मंदिर ते आदर्श नगरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, व्यंकटेश्वर राम मंदिरास वॉल कंपाऊंड करणे आदी कामांना मंजुरी मिळाली आहे.

