संगायोसह विविध योजनेच्या 350 प्रकरणांना रावेरात मंजुरी
रावेर : रावेर तहसीलमध्ये 23 जानेवारी रोजी घेतलेल्या बैठकीत 214 संजय गांधी निराधारसह विविध योजनेची प्रकरणे मंजूर करण्यात आली तर तब्बल सात महिन्यांनी 17 जुलैला घेतलेल्या बैठकीत पुन्हा 350 विविध प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहिती संजय गांधीचे नायब तहसीलदार एम.जे.खारे यांनी दिली. निराधार महिलांना शासनाचा आधार मिळावा म्हणून शासन संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना यासह इतर योजनेद्वारे निराधार महिलांना मदत करत असते परंतु जानेवारी महिन्यात 214 विविध प्रकरणे मंजूर केले त्यानंतर जुलैपर्यंत तब्बल एक हजार 200 प्रकरणे आली. त्यातील 350 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून अव्वल कारकुन जी.एन.शेलकर, अव्वल कारकुन आर.ए.तडवी, लिपिक वाय.व्ही.गोटीवाले, पुरूषोत्तम महाजन आदींचे सहकार्य लाभले.
मंजूर प्रकरणाची यादी लवकरच प्रसिध्द करणार : खारे
रावेर तालुक्यात गरजू, गरीब, विधवा, वृध्द महिलांच्या प्रकरणांची तपासणी करून त्यांना मंजुरी देण्यात आली असून लवकरच सर्व लाभार्थीच्या नावांची यादी तयार करून प्रसिध्द केली जाईल, असे संजय गांधी निराधारचे नायब तहसीलदार एम.जे.खारे यांनी सांगितले.
वर्ष होण्यात आले तरी समितीचा अजूनही थांगपत्ता नाही
विधानसभा निवडणूक होवून वर्ष होण्यात आले तरी सुध्दा नवीन समिती नियुक्त करण्यात आलेली नाही परीणामी प्रकरणे मंजूर होण्यास विलंब होत आहे. तालुक्यातील वृध्द महिलांची आपल्या प्रकरणांच्या चौकशीसाठी पायपीट होत असून यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडदेखील बसत आहे.

