घटस्फोट घेण्यासाठी विवाहितेचा छळ : पतीसह सात जणांवर गुन्हा
जळगाव : शहरातील गेंदालाल मिल येथील माहेर व आर्वी, ता.जि. धुळे येथील सासर असलेल्या 30 वर्षीय विवाहितेने पतीपासून घटस्फोट घ्यावा यासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी शिवीगाळ, मारहाण व शारिरीक छळ केल्याप्रकरणी शुक्रवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटस्फोट घेण्यासाठी मारहाण
शहरातील गेंदालाल मिल परीसरात राहणारी 30 वर्षीय विवाहिचे धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील सचिन नामदेव पाटील याच्याशी दहा वर्षांपूर्वी लग्न झाले. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. दरम्यान सन 2010 पासून ते आजपर्यंत पतीने काहीना काही कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मारहाण करून शारीरीक छळ करण्यास सुरूवात केली. तसेच पती सचिन पाटील यांना विवाहितपासून घटस्फोट घेण्यासाठी मारहाण करण्यासाठी प्रवृत्त करीत होते. यात सासरे नामदेव चिंतामणे पाटील, सासू निर्मलाबाई नामदेव पाटील, नणंद बालाबाई प्रशांत पाटील (सर्व रा. आर्वी ता.जि.धुळे), नणंद ज्योती अनिल सुर्यवंशी (रा.नाशिक), नणंद जयश्री सोहील जाधव आणि सोहिल जाधव (रा.पुरसद, ता.आलपाड, जि. सुरत गुजरात) यांचा समावेश आहे. हा छळ असहाय्य झाल्याने विवाहिता माहेरी जळगाव येथे निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाईक नितीन अत्तरदे करीत आहे.


