महसूलने जप्त केलेली २१ लाखाची ५०० ब्रॉस वाळू तस्करांनी लांबविली
रावेर : रावेर महसूलने जप्त केलेली २१ लाख रुपये किंमतीचा पाचशे ब्रास अवैध वाळू चोरीला गेली आहे. हा सर्व प्रकार निव्वळ निष्काळजीपणामुळे घडला आहे. या संदर्भात तहसीलदार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रर्यत्न केला असता होऊ शकला नाही. १० डिसेंबर रोजी तालुक्यातील निंभोरासीम येथे अवैध वाळूवर कारवाईसाठी महसूल पथक गेले होते. त्यावेळी गेलेल्या पथकाला दत्त मंदीरच्या मागच्या बाजूला एक अवैध वाळूचा साठा तर दूसरा बोहर्ड-निंभोरासीमम शिव रस्त्यावर वाळूचा एकूण ५०० ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करून पोलिस पाटील यांच्या ताब्यात दिला होता. या घटनेला आज एक महिना 20 दिवस उलटले असून आज या वाळू साठा तपासला असता सर्व वाळू चोरीला गेली आहे. प्रशासनाच्या ढिलाईमुळे शासनाला लाखो रूपयाचा चुना लागला आहे. दरम्यान, जप्त केलेली वाळू उघड्यावर होती गोडाऊन मध्ये नव्हती त्यामुळे वाळु साठ्याचे संरक्षण सुध्दा जिकरीचे होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तात्पर्य दाखवत लिलावाच्या कार्यवाहीला गती देणे अपेक्षित होते परंतु तसे घडले नाही.
शासकीय दराने २१ लाखाची वाळू
शासकीय दरानुसार, एक ब्रास वाळूचे दर ४ हजार २०० रुपये आहे. या प्रमाणे महसूल पथकाने जप्त केलेली ५०० ब्रास वाळू ही शासकीय दराप्रमाणे २१ लाख रूपयांची असून जप्त केलेली वाळू लिलाव होण्याआधीच चोरीला गेली आहे.

ढिलाईपणामुळे ५०० ब्रास वाळू गेली चोरीला
महसूल पथकाने १० नोहेंबरला ५०० ब्रास उघड्यावर असलेला अवैध वाळूचा साठा जप्त केला. त्या नंतर जप्त केलेल्या वाळूची तत्काळ लिलाव करून विल्हेवाट लावत दंड वसूल करणे गरजेचे होते परंतु महसूल प्रशासनाने ढिलाईपणा केला आणि जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे 2४ डिसेंबर म्हणजे तब्बल २४ दिवसांनी पत्रव्यवहार करण्यात आला होता. आज ३० डिसेंबर रोजी जप्त केलेल्या वाळू साठ्याची रिअँलीटी चेक केले असता सर्व वाळू चोरी गेली आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने त्याचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला आहे.

