९० लाखांची थकबाकी : जिल्हाधिकारी आवर्तन सोडण्यासाठी सकारात्मक
भुसावळ : नगरपरीषदेकडे असलेल्या ९० लाख ७६ हजार रुपयांची थकबाकी न भरल्याने पाटबंधारे विभागाने हतनूर धरणातून सोडण्यात येणारे आवर्तन थांबवले आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत आवर्तन न मिळाल्यास शहरातील पाणीपुरवठा ठप्प होणार आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या मध्यस्थीमुळे गुरुवारी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक झाली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवर्तन सोडण्यात संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.
दोन कोटी 14 लाख 32 हजारांची थकबाकीपाटबंधारे विभागाची भुसावळ पालिकेकडे नोव्हेंबर २०२० अखेर २ कोटी १४ लक्ष ३२ हजार रुपये थकबाकी आहे. त्यात भुसावळ नगरपालिकेला देय असलेली लोकल फंडची रक्कम १ कोटी २३लाख ५६ हजार रुपये समायोजीत केल्यास पालिकेकडे ९० लाख ७६ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक राहते. पालिका प्रशासनाने ही थकबाकी भरली नाही. दरम्यान पालिकेने २७ डिसेंबर रोजी पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करुन हतनूरमधील आरक्षीत कोट्यातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी केली. मात्र पाटबंधारे विभागाने थकबाकीची रक्कम भरणा हेात नसल्याने आतर्वन सेाडण्यास नकार दिला आहे. हतनूरमधून पाच ते सहा दिवसांत आवर्तन न मिळाल्यास भुसावळ शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होईल. या प्रकरणी पाणीपुरवठा सभापती शोभा नेमाडे यांनी ही बाब नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना कळविली. प्रशासनाने यासंदर्भात खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्याकडे मागणी केली. यानुसार आता पाटबंधारे विभाग व पालिकेतील थकबाकीच्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत आवर्तन सोडण्यात संदर्भात जिल्हाधिकारी सकारात्मक असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले शिवाय पालिकेची देखील रेल्वेकडे मोठे घेणे असल्याने लवकरच यासंदर्भात करार होणार असून हा प्रश्न सुटणार असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले.


