तीन वर्ष उलटूनही अमृत योजनेला नाही गती


भुसावळकरांना पाणी मिळेल? प्रश्न अनुत्तरीत

भुसावळ : शहरातील महत्वकांक्षी योजना असलेल्या अमृतचे ३० डिसेंबर २०१७ रोजी भुमीपूजन झाले. या योजनेचे भुमीपूजन होऊन तब्बल तीन वर्षांचा कालावधी उलटला मात्र अद्यापही योजनेचा जलस्त्रोताला अंतीम मंजूरी मिळाली नाही. सुधारित प्रशासकिय मान्यतेच्या प्रस्तावाला मान्यता नसल्याने या योजनेतून भुसावळकरांना पाणी कधी मिळेल? हा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृत योजनेचा जलस्त्रोत निश्चित झाला होता. तापी पात्रातील यावल पुलाच्या पश्चिमेकडील भागात यापूर्वी जलसंपदा विभागाने जिओग्राफिकल सर्वेक्षणही पूर्ण केले होते, मात्र यानंतर हा बंधारा शेळगावच्या बुडीतक्षेत्रात येत असल्याचा साक्षात्कार या विभागाला झाला. अनेक नियम, अटी, शर्ती समोर आल्या. डझनभर बैठक, तज्ज्ञांचे सल्ले, नगरविकास विभागाच्या बैठकांचे सत्र झाले. यानंतर अमृत योजनेचा जलस्त्रोत बदलविण्यात आला. शेळगाव बॅरेजच्या मृतसाठ्यातून या जलस्त्रोताला तत्वत: मंजूरी मिळाली, मात्र अद्यापही अंतीम मंजूरी प्रतिक्षेत आहे. यानंतर पालिकेने मजीप्रच्या माध्यमातून या योजनेला सुधारित प्रशासकिय मान्यतेचा प्रस्ताव पाठवला होता. नवीन जलस्त्रोतानुसार सुमारे ९ किलोमिटर अंतराची पाईपलाइनचे वाढीव काम करावे लागणार आहे. यासोबतच जलशुध्दीकरण केंद्राची जागाही बदलणार आहे. नवीन नियोजनानुसार महामार्गावरील एका जागेवर हा जलशुध्दीकरण प्रकल्प उभा राहिल. मात्र या सर्व कामांना गती देण्यासाठी सुधारित प्रशासकिय मान्यतेचा प्रस्तावाला मंजूरीही गरजेची आहे. मात्र तब्बल तीन वर्ष उलटूनही हे काम संथ गतीने सुरु असल्याने यातून भुसावळकरांना पाणी कधी मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाढीव मुदतीत कामे होणार काय?


अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पाईपलाइन व जलकुंभाच्या कामाला दोन वर्षाची मुदत होती. ही मुदत संपून आता अजून एक वर्षही संपले आहे. ठेकेदार व पालिकेत झालेल्या चर्चेनुसार ठेकेदारास मार्च २०२१ पर्यंत पाईपलाइन व ऑगस्ट २०२१ पर्यंत इतर कामांची मुदतवाढ दिली आहे. या वाढीव मुदतीत तरी कामे होतील काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !