जिल्हाधिकार्‍यांकडे राजकीय द्वेषातून दाखल झाली तक्रार


माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांची माहिती : निवडणुका जवळ आल्याने काहींना राजकारण करण्याची संधी

भुसावळ : यावल-रावेर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवितांना भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी अनेक गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात लपविली तसेच चौधरी यांना झालेल्या शिक्षेचाही यात समावेश नसल्याचे नमूद करण्यात असल्याचा आरोप करीत दीपक व्ही.पाटील (हुडको कॉलनी, जामनेर रोड) यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या संदर्भात माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांची भूमिका जाणून घेतली असता ते म्हणाले की, राजकीय द्वेषातून आपल्याविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीवेळी तब्बल पाच तास आपल्या अर्जाची छाननी करण्यात आली शिवाय आपण निवडणुकीवेळी रावेर येथे वास्तव्यासही होतो, असेही ते म्हणाले.

माहिती अधिकारातून अनेक बाबी उघड
दीपक पाटील यांच्या तक्रारीनुसार, अनिल चौधरी हे भुसावळचे रहिवासी असताना त्यांनी रावेर विधानसभा निवडणुकीत 1/1/02, स्टेशन रोड, मराठा मंगल कार्यालयाजवळ, मानकर प्लॉट, रावेर असा पत्ता दिला असून तो खोटा आहे. या शपथपत्रात केवळ नऊ केसेसची माहिती देण्यात आली असून अन्य केसेसची माहिती देण्यात आलेली नाही. चौधरी यांनी नवशक्ती आर्केडमधील 26 लाख 85 हजार रुपये बाजारमूल्य असलेली मालमत्ता सात लाखात खरेदी केल्याचे नमूद असून 24 जानेवारी 2021 रोजी दोन दैनिकात त्यांनी या मालमत्तेचे मूल्य तीन कोटी असल्याचे सार्वजनिक केले आहे. त्यामुळे चौधरी यांनी सादर केलेल्या नामनिर्देशनपत्रात खोटी माहिती सादर केल्याने त्यांनी शासनाची फसवणूक केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.



चौधरी परीवाराभोवती वलय असल्याने राजकीय द्वेषातून तक्रारी
गेल्या चार वर्षात भुसावळ शहरात काय कामे झालीत हे जनतेला निश्‍चित ठावूक असून केवळ निवडणुका जवळ आल्याने वलय असलेल्या चौधरी परीवाराला टार्गेट करण्याचा हा प्रयत्न आहे. निव्वळ राजकीय द्वेषातून या तक्रारी दाखल होत आहेत. वास्तविक निवडणुकीवेळी आपल्या अर्जाची तब्बल पाच तास अधिकार्‍यांनी चौकशी केली व त्यानंतरच अर्ज दाखल करण्यात आला. निवडणुकीवेळी आपण रावेरातच वास्तव्यास होतो त्यामुळे तक्रारीत तथ्य नाही, असेही चौधरी म्हणाले. भुसावळकरांचे आजही चौधरी बंधूंवर प्रेम कायम असून केवळ राजकीय बदनामी करण्यासाठी, असे आरोप होत असतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !