कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हरपले : राज ठाकरे
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुषमा स्वराज यांना वाहिली श्रद्धांजली
मुंबई : भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाबाबत सर्व स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असल्याचं राज यांनी सांगितले. विचारधारा वेगळ्या असल्या तरी प्रत्येकाशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती कायम लक्षात राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुषमाजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
कुशल प्रशासक हरपल्या -शरद पवार
सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करताना उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती हरपल्याची भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
क्रीडा विश्वाकडूनही श्रद्धांजली
नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच असून सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारंअसल्याचे क्रीडा विश्वातील खेळाडूंनी म्हटले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या बातमीने खुप दु:ख झाले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो असे कोहली म्हणाला. त्याचप्रमाणे सुषमा स्वराज यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले. एक ज्येेष्ठ नेत्या व भाजपाची आधारस्तंभ असणारी व्यक्ती गमावल्याचे भारताचा माजी क्रिकटपटू व खासदार गौतम गंभीरने सांगितले.