आंबेगावातील घोड नदीत तिघे बालके बुडाली
रविवारचा आनंद उठला जीवावर : पोहताना पाण्याच्या प्रवाहात वाहिले
पिंपरी : रविवार हा सुटीचा दिवस असल्याने पुण्याच्या आंबेगावमध्ये तीन मुलं घोडनदीत पोहण्यासाठी उतरली मात्र पाण्याच्या प्रवाहात ती वाहिल्याची दुर्दैवी घटना घडली. वैभव वाव्हळ (वय 16), श्रेयस वाव्हळ (वय 15) आणि प्रणय वाव्हळ (वय 15) अशी तिघांची नावं आहेत. हे तिघेही मित्र असून तिघे शिंगवे गावातील आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नदी किनारी त्यांचे कपडे, चपला, मोबाईल आणि इतर वस्तू आढळल्या. त्यामुळं ते तिघे पोहायला पाण्यात उतरल्याने वाहून गेल्याचा अंदाज बांधण्यात आला. मंचर पोलिसांना याची खबर देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पातळीवर शोध घेण्यास अपयश आल्याने, आता एनडीआरच्या टीम कडून या बालकांचा शोध सुरू करण्यात आला आहे.