यावलमधील शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेला पेहरन-ए-शरीफ उत्सव रद्द


कोरोनामुळे दोन वर्षांपासून उत्सव होतोय रद्द : पारंपरीक पद्धत्तीने होणार धार्मिक विधी

यावल : शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या यावल शहरातील पेहरन-ए-शरीफ उत्सव यंदादेखील कोरोना कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. असे असलेतरी पारंपरीक पद्धत्तीने होणार धार्मिक विधी मंगळवार, 24 रोजी पार पडतील. यंदादेखील पोलीस ठाण्यात घेतलेल्या बैठकीत उत्सव रद्द करण्याचा निर्णय आयोजन समिती डांगपूरा यांनी जाहिर केले.

मिरवणुकीची शेकडो वर्षांपासून प्रथा
शहरातील नजमोद्यीन अमीरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र)असे म्हणतात. स्वातंत्रपूर्व काळापासून येथे या पवित्र वस्त्राची सजविलेल्या डोलीतून शहरातून वाद्यवृंदाच्या गजरात धार्मीक गीत (नातेपाक) गात मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. दरवर्षी उर्दू वर्षानुसार मोहरम महिन्याच्या 14 तारखेस हा उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवात सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन अर्थात तब्बरूक (पवित्र वस्त्र) चे दर्शन घेण्याकरीता राज्यासह परराज्यातील सर्वधर्मिक बांधव येथे येतात त्यामुळे शहरास यात्रेचे स्वरूप येते. उत्सवात सर्वधर्मिय बांधव मोठया संख्येने सहभागी होत असल्याने उत्सवात एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणूकी दरम्यान पेहरन-ए-शरीफच्या डोलीखालून निघतांना भाविक मन्नत (मागणे) मागतात. भाविकाने मागीतलेले मागणे हमखास पूर्ण होते, अशी हिंदु-मुस्लीम सर्व धर्मिय बांधवांची भाविकांची श्रध्दा आहे.




कोरोना संकटामुळे उत्सव रद्द
गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट आल्याने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हा उत्सव रद्द करण्यात येत असून यंदादेखील पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी यंदाची उत्सव समिती डांगपुराचे सदस्यासोबत बैठक घेतली. यात हा उत्सव यंदादेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पारंपरीक पध्दतीने मंगळवारी सायंकाळी उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडला जाईल. या ठिकाणी कुणीही दर्शन घेण्यासाठी येवू, नये आवाहन उत्सव समिती डांगपुरा अध्यक्ष शेख असलम शेख मुन्सी, उपाध्यक्ष शेख मुशीर शेख बशीर, खजिनदार शेख रशीद शेख बशीर, सचिव शकील खान कुरेशी, शेख अलताफ, शेख रशीद मन्यार, शेख रईस, शेख इमरानसह आदींनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !