निकृष्ट कामावर शिक्कामोर्तब : भुसावळातील अटल उद्यानाची भिंत कोसळली
निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी
भुसावळ (दिनांक 7 सप्टेंबर 2021) : शहरातील अटल उद्यानाची भिंत शनिवारी झालेल्या पावसामुळे कोसळली असून या प्रकाराबाबत पालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. कोसळलेल्या या भिंतीमुळे उद्यानाचे काम निकृष्ट झाल्याच्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाला आहे. आरसीसी भिंतीला फाऊंडेशन नसल्याने हे नुकसान झाल्याची बाब समोर आली. तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च होऊन शहरात अटल उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती मात्र देखभाल-दुरुस्तीअभावी आजघडीला या उद्यानाची रया गेली आहे.
किरकोळ पावसात भिंत कोसळली कशी?
पालिका प्रशासनाने अमृत योजनेच्या ग्रीन स्पेस अंतर्गत अडीच कोटींच्या निधीतून सोमाणी गार्डनमागील भागात अटल उद्यानाची निर्मिती केली आहे. या उद्यानाला उत्तर, दक्षिण व पश्चिम भागात संरक्षण भिंतीची उभारणी करण्यात आली मात्र शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे उत्तर भागाकडील साडेपाच फूट उंचीची व सुमारे 300 मिटर लांबीची भिंत कोसळली. आरसीसी बांधकाम असलेली ही भिंत किरकोळ पावसात कोसळली कशी ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. अत्यंत नित्कृष्ठ कामामुळे ही भिंत कोसळल्याचा आरोप उघडपणे होत आहे. विशेष म्हणजे भिंत कोसळून दोन ते तीन दिवस उलटूनही पालिका प्रशासनाला याबाबत माहिती नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे.




