ब्रह्मनाळला बोट उलटल्याने 16 नागरीकांना जलसमाधी
बेपत्ता नागरीकांचा शोध ; मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव
सांगली : पुरात अडकलेल्या नागरीांना बाहेर काढत असताना बोट उलटल्याने सुमारे 16 नागरीकांना जलसमाधी मिळाली तर बोटमधील अन्य नागरीकांचा शोध सुरू आहे. ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे ही घटना गुरुवारी घडली. ब्रह्मनाळ येथे कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो. सध्या कृष्णा नदीला महापूर आला असून ब्रह्मनाळ येथे नदीचे पात्र अक्राळविक्राळ बनले आहे. संपूर्ण ब्रह्मनाळ गावाला महापुराच्या पाण्याने वेढा दिला असून गावात तीन दिवसांपासून पाणी असल्याने नागरीक भीतीच्या सावटाखाली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर, सातारा, सांगलीत पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ ते घटनास्थळाकडे ताफ्यासह रवाना झाले.
क्षमतेपेक्षा अधिक लोक बसवल्याने बोट उलटली
ब्रह्मनाळ गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असताना गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या बोटेतून नागरीकांना सुरक्षितस्थळी हलवताना बोटेत तब्बल 32 जण बसले होते. बोट (नाव) कडेने गावाबाहेर जात असताना नावेचा पंखा पाण्यातील झाडात आणि पाईपमध्ये अडकला. नावेतील वाढलेले वजन आणि पंखा अडकल्याने नाव उलटली. 32 पैकी 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी काही पाण्याबरोबर वाहून जाऊन कडेला अडकल्याचे सांगण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय पथक बचावकार्यात सहभागी असून घटनास्थळी आक्रोश आणि गोंधळ सुरू आहे. गावात आणखी 200 ग्रामस्थ अडकून पडले आहेत.
82 हजार नागरीकांचे स्थलांतर
दरम्यान, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सुमारे 15 हजार 836 कुटुंबांतील 82 हजार 405 लोक व 22 हजार 258 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी अनेक गावं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. जवळपास 50 हजारांहून अधिक लोकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. तर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.