धरणगावात बंद घरातून अडीच लाखांचा ऐवज लांबवला
धरणगाव : शहरातील मातोश्री नगरात बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने मिळून सुमारे अडीच लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांच्या पथ्यावर
सुरेखा संजय भदाणे (48, रा.मातोश्री नगर, धरणगाव) या कुटुंबीयांसह राहतात. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 29 सप्टेंबर सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या असता चोरट्यांनी संधी साधली. घरातील पाच हजार रुपयांची रोकड आणि 2 लाख 46 हजार 320 रुपयांचे दागिने मिळून एकूण दोन लाख 51 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. या प्रकरणी सुरेखा भदाणे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.

