नाशकात गोदावरी नदीपात्रात बुडाल्याने तिघांचा मृत्यू
नाशिक : शहरातील गोदावरी नदीपात्रात बुडाल्याने तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अवघ्या बारा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली. यात उत्तम नगरमधल्या गणेश कॉलनीतले महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आले होते. या कुटुंबातील रावसाहेब महाजन (36) यांचा पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले. त्यांना शोधण्यासाठी जीवरक्षक जवानांनी खूप प्रयत्न केले. मात्र उशिराने त्यांचा मृतदेह हाती लागला. रावसाहेब यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परीवार आहे. दुसर्या घटनेत पाण्यात पडलेले रावसाहेब महाजन यांचा शोध घेताना जीवरक्षक जवानांना एक मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता, तो ओवेस नदीम खान या अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाचा असल्याचे समजले. तिसर्या घटनेत साहील सलीम अन्सारी या अवघ्या बारा वर्षांच्या मुलाचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाला. तो नाशिकमधल्या बुधवार पेठेत वास्तव्यास होता. साहील हा घरात कोणालाही न सांगता गोदापात्रावर अंघोळीला गेल्या असल्याचे समजते. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
