क्रुझ ड्रग्ज प्रकरणाला वेगळे वळण : 25 कोटींच्या डीलमधून समीर वानखेडेंना आठ कोटी मिळणार असल्याचा प्रभाकर साईल यांचा आरोप
मुंबई : आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका, 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साईल यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही प्रभाकर साईल यांनी केला आहे.
कोर्या कागदांवर स्वाक्षरी घेतल्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईल हा किरण गोसावींचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारीपूर्वी गोसावीला कोर्या कागदावर सही करण्यासाठी मजबूर करण्यात आले. क्रुझवर ड्रग्ज मिळाले की नाही याबाबत कल्पना नाही परंतु कोर्या कागदाचा वापर आर्यन प्रकरणात झाला. किरण गोसावी कुणासोबत तरी फोनवर बोलत होता. ज्यात 25 कोटींचा बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख होता. ही डील 18 कोटींमध्ये सेटल होणार होती. ज्यातील आठ कोटी समीर वानखेडे यांना मिळणार होते. या संवादात शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीकडून पैसे घेण्याचा उल्लेख होता. पूजा फोन उचलत नव्हती, असेही संवादात म्हटले गेले. मुंबई क्रुझवर धाड टाकण्यापूर्वी किरण गोसावीला एनसीबी कार्यालयाबाहेर सॅम डिसुझा नावाचा व्यक्ती भेटला होता. छापेमारीवेळी सावधतेने काही व्हिडीओ आणि फोटो घेतले गेले. एका व्हिडीओत स्पष्टपणे दिसत होतं की, गोसावीने ताब्यात घेण्यापूर्वी आर्यन खान कुणाशी तरी फोनवरुन संवाद साधत होता. या कारवाईमागे मोठं षडयंत्र असल्याचा संशय प्रभाकर साईलनं व्यक्त केला आहे.



ही बातमी वाचली का- साईल यांनी कोर्टात म्हणणे मांडावे : एनसीबी
सॅम नावाच्या व्यक्तीला शोधण्याचे आवाहन
आर्यन खान प्रकरणात एनसीबीने किरण गोसावीला साक्षीदार बनण्यासाठी दबाव टाकला होता. साक्षीदाराला छापेमारीची माहिती कशी मिळू शकते. पंचनामा कारवाईआधीच केला होता. लोकांकडून सह्या घेतल्या होत्या. या कारवाईमागे तो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत गोसावीने आर्यनशी फोनवरुन बोलणं करुन दिलं होतं. या संवादानंतर आर्यनला ताब्यात घेण्यात आलं. प्रभाकरने सॅम नावाच्या व्यक्तीचा शोध घेण्याचं आवाहन केले आहे. ज्याला छापेमारीपूर्वी किरण गोसावी एनसीबी कार्यालयाबाहेर भेटला होता. एनसीबीच्या क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीचे अधिकारी, मी, किरण गोसावी आणि मनिष भानुशाली इतकेच उपस्थित होतो, अन्य कोणीही पंच उपस्थित नव्हते. माझ्या जीवाला धोका असल्याने सोलापूरला जाऊन राहिलो होतो. पंच असूनही आता कुटूंबीयांना धोका असल्याने सर्व सत्य सांगत आहेत, असे प्रभाकर साईलने सांगितले आहे.
