केळी भावात तफावत : केळी व्यापार्यांकडून नफेखोरीचा आरोप
यावल : गेल्या अनेक दिवसांपासून केळीचे बोर्डाचे भाव आणि खरेदी भाव यात मोठी तफावत निर्माण झाली असून जे भाव बोर्डाने ठरवले आहेत ते व्यापारी मान्य करत नाहीत आणि अतिशय पडलेल्या भावात शेतकर्यांकडून माल खरेदी करून नफेखोरी करीत असल्याचा आरोप करीत भाजपा पदाधिकार्यांनी प्रांताधिकारी प्रशासनाला नुकतेच निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व व्यवस्थेवर बाजारसमितीचा वचक गरजेचा असताना तसे होत नसल्याने व्यापार्यांचे फावत असल्याचा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
केळी उत्पादकांची होतेय अडवणूक
निवेदनाचा आशय असा की, बाजार समितीत अनेकवेळा ठराव करून सुद्धा शेतकर्यांची पिळवणूक होत आहे. एक हजार रुपये केळी बोर्डाचा भाव असताना अवघ्या 200 ते 300 रुपयांमध्ये केळीची खरेदी केली जात आहे. शेतमाल शेतातच पिकतो, वाया जातो तरी कापणी होत नाही या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे ही शेतकर्यांची मागणी आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना कराव्यात अन्यथा शेतकर्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि योग्य कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजपा पदाधिकार्यांनी दिला आहे. केळी महामंडळ स्थापन होईल तेव्हा होईल आणि उपाययोजना करेल तेव्हा करेल तोपर्यंत केळी उत्पादक शेतकर्यांनी मरणयातना सोसायच्या का? असा प्रश्न उपस्थित करीत तत्काळ या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ.कुंदन फेगडे, डॉ.नरेंद्र कोल्हे, रीतेश बारी, तुषार चौधरी, मनोज बारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


