भुसावळातील अतिक्रमण थांबवा : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पालिका मुख्याधिकार्यांना सूचना
भुसावळ : पालिकेच्या सुविधा हव्यात तर कर भरणा करायलाच हवा, असे सांगत डीपीडीसीतून सीसीटीव्हीसाठी जितका निधी देण्यात येईल तितकाच निधी राज्य सरकार देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नगरपालिकेने उत्पन्न वाढीचे मार्ग वाढवायला हवेत, असे सांगून अतिक्रमणाच्या बाबतीत शहरातून तक्रारी आल्याने पालिकेने कारवाई करावी व त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त पुरवावा, अशा सूचना त्यांनी केल्या. पालिकेने हॉकर्स झोनसाठी आरक्षण ठेवावे, असेही ते येथे म्हणाले. शुक्रवार, 17 रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्याहस्ते पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
चांगल्या लोकांना निवडून द्या
शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासंदर्भात मुंबईत बैठक घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले की, सारखे-सारखे पाणीपुरवठ्याचे सोर्स बदलणे योग्य नाही. शहरातून तापी नदी गेल्याने तिचे पावित्र्य राखणे गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्या प्रकल्पांची गरज आहे. शहर विकासासाठी चांगल्या व व्हिजन असलेल्या लोकांना निवडून द्या, असेही ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील कारखाने बाहेरील जिल्ह्यात लोक घेवून चालवत आहेत, असे सांगून आपल्या पुतण्यानेच चोपडा कारखाना घेतला, असेही ते म्हणाले.
विकासकामांचे ऑनलाईन उद्घाटन
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते भुसावळ पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ऑनलाईन रीमोटची कळ दाबून करण्यात आले. तत्पूर्वी जुना सातारा भागातील लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
भुसावळच्या विकासासाठी निधी द्या : रमण भोळे
प्रास्ताविकात रमण भोळे यांनी शहरातील यापूर्वी व सत्ता आल्यानंतरच्या परीस्थितीचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, पालिकेत निधी पडून असतानाही काही तथाकथित लोकांच्या हस्तक्षेपामुळे कामे करता आली नाहीत. असे असताना दिवाबत्तीपासून रस्ते सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शंभर टक्के विकासाची कामे झालेली नाहीत मात्र आता विकासाची घौडदोड सुरू झाली आहे. खासदार व आमदारांनी मदतीचात हात दिल्यानंतर 750 हायमास्ट शहरात लावण्यात आले. पालकमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून शहराचे अद्याप ग्रहण सुटले नसल्याने मोठ्या प्रमाणावर उपमुख्यमंत्र्यांनी निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
खडसे म्हणाले ; अस्वच्छतेतून शहर सावरले नाही
माजी मंत्री खडसे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपूर्वी स्थिती काय होती हे मी सांगणार नाही कारण भुसावळकरांनी ते अनुभवले आहे. आता रस्त्यांची कामे सुरू आहेत, स्वच्छता होत आहे मात्र अस्वच्छतेतून शहर अद्याप सावरले नसल्याची कबुली त्यांनी दिली. घरकुलांचा प्रस्ताव प्रलंबित असून त्यास मंजुरी मिळावी तसेच अमृतच्या विस्तारीत योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार अनिल भाईदास पाटील (अमळनेर), लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा निमंत्रक अविनाश आदिक, नगरसेवक मुकेश पाटील, अॅड.बोधराज चौधरी, प्रा.दिनेश राठी, अमोल इंगळे, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी मकासरे, शैलजा नारखेडे, पिंटू ठाकूर, सविता अहिरे, पूजा सूर्यवंशी, माजी नगरसेवक वसंत पाटील, दिनेश नेमाडे, शफी पहेलवान, शरीफ ठेकेदार, पुरूत्तोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, अजय नागराणी तसेच जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



