माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले ; दादा आले की चांगले-चांगले सरळ होतात !
भुसावळ : अजितदादा जिथे जिथे जातात तेथे चांगले-चांगले सरळ होतात, असे सांगत भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले की, भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर विस्थापीत झालेल्या नागरीकांना घरकुल देणे काळाची गरज असून भुसावळ पालिकेच्या प्रस्तावीत इमारतीसाठी पाच कोटींचा निधी मिळावा, महाराष्ट्रातील नगराध्यक्षांना स्वाक्षरीचे अधिकार पूर्ववत देण्यात यावेत कारण आता हे अधिकार मुख्याधिकार्यांना असल्याने ते स्वतःच टेंडर भरत असल्याचे ते म्हणाले. भुसावळात मोठे उद्योग आणून बेरोजगाराची प्रश्न सोडवावा तसेच मसाकावर तीन हजार कामगारांचा उदरनिर्वाह असून हा प्रश्न जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यातून असल्याने तो सोडवण्याची अपेक्षा व्यक्त करीत भुसावळ शहरालाा जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री एकनाथराव खडसे आदी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत डी.एस.ग्राऊंडवर शुक्रवारी झाला. याप्रसंगी चौधरी बोलत होते.
चौधरी म्हणाले ; दोन-चार लोकांची दुखापत वाढली
आगामी काळात नाथाभाऊ व आपण सोबत मिळून काम करणार असल्याचे सुतोवाच भाषणात माजी आमदार चौधरी यांनी केले. विकासासाठी आम्ही एकत्र येणार असून कुणीही जुना-नवा असा वाद करता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केला. काही दोन-चार लोकांची आमच्या एकत्र आल्याने पोटदुखी वाढली असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.


आमदार संजय सावकारेदेखील आमचेच ! : नाथाभाऊंच्या वक्तव्याने उडवली भुसावळात धमाल
रेल्वे विस्थापीतांना घरकुल देणार : उपमुख्यमंत्री
भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवण्यात आल्यानंतर नागरीकांचे पुर्नवसन करणे गरजेचे असताना त्यांना वार्यावर सोडण्यात आले मात्र विस्थापीतांना त्यांच्या हक्काचे घरकुल बांधून दिले जाईल, हे निवडणुकीतील आश्वासन नसून अजितदादांनी दिलेला शब्द आहे व दिलेला शब्द खरा करणे हीच माझी ओळख असून त्यासाठी भले मोठी किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही, अशी ग्वाही भुसावळातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळाव्यात दिली.
पालिकेने सुधारीत प्रस्ताव पाठवल्यास मुंबईत बैठक लावणार !
अजितदादा पवार म्हणाले की, रेल्वेच्या हद्दीत अनेक वर्षांपासून राहणार्या नागरीकांना विकासाच्या नावाखाली जाग सोडण्यास भाग पाडण्यात आले मात्र त्यांचे पुर्नवसन करणे गरजेचे असताना त्यांना वार्यावर सोडण्यात आले. कुठल्याही शहरात विमानतळ, धरणे वा जागा अधिग्रहण करताना अतिक्रमण हटवावे लागते मात्र संबंधितांचे पुर्नवसन देखील करणे गरजेचे आहे. भुसावळातील रेल्वे हद्दीतून विस्थापीत झालेल्या नागरीकांना निश्चित त्यांच्या हक्काचे घरकुल दिले जाईल, पालिकेने त्या संदर्भात सुधारीत प्रस्ताव पाठवावा, मुंबईत त्याबाबत बैठक लावण्यात येईल, असेही ते म्हणाले.
