कोल्हापुरातील सेल्फिने जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची नेटकर्यांनी उडवली खिल्ली
विरोधकांनी उठवली टिकेची झोड ; कोणत्याही गोष्टी करून राजकारण -महाजनांचे स्पष्टीकरण
कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रात पूराचा कहर झाला असताना कोल्हापुरात बचाव पथकासोबत पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पूरस्थितीतही बोटीत बसून सेल्फी काढण्यात गुंग असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकर्यांनी या व्हिडिओला ट्रोल करीत महाजनांची चांगलीच खिल्ली उडवली आहे तर विरोधकांनी महाजनांच्या या कृतीवर टिका केली आहे. दरम्यान, सांगलीतील पूरग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला असून, त्यांनी महाजनांना घेराव घातला आहे तर शेवटच्या पूरग्रस्तांना बाहेर काढल्याशिवाय आपण शहर सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण महाजनांनी देत कोणत्याही गोष्टीवरून विरोधक राजकारण करीत असून अनेक जण सेल्फिसाठी आग्रह धरत असल्याने कुणा-कुणाला थांबवणार असेही महाजन यांनी सांगितले आहे.
जलसंपदा मंत्र्यांचा सेल्फि व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा- https://youtu.be/vvmY4TpuuIw
हौशी कार्यकर्त्यामुळे मंत्री महाजन ट्रोल
कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना एका कार्यकर्त्यानं हा व्हिडिओ काढला असून पूरग्रस्त भागाची पाहणी करताना कार्यकर्ता मोबाइलद्वारे चित्रण करत आहे शिवाय महाजन या कार्यकर्त्याला ‘पाणी दाखव’ असे सांगताना स्पष्टपणे दिसत असून व्हिडिओत महाजनही ’स्माइल’ देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटकर्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, महाजनांच्या या व्हिडिओवर नेटकर्यांनी मदत करायला गेले की एन्जॉय करायला, नाचून घ्या, निव्वळ फालतूपणा असल्याच्या कमेंटस नेटकर्यांनी करीत महाजनांना चांगलेच ट्रोल केले आहे.
तोपर्यंत शहर सोडणार नाही -मंत्री महाजन
पूरग्रस्त भागाची पाहणी करताना अनेक जण सेल्फी काढण्यासाठी आग्रह धरतात त्यामुळे किती जणांना थांबवणार असा प्रश्न पडतो. सेल्फी व्हिडिओ काढताना मी हात पुढे करून थांबवण्याचा प्रयत्नही केला. आम्ही येथे मदतीसाठी आलो आहोत. पूरग्रस्तांना मदत देण्यास आमचे प्राधान्य आहे. उगाच कुणीही कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करू नये. सांगलीतील शेवटच्या माणसाला पुरातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, असे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे.