आला घरी पाहुणा ; लावला ‘पाच लाखांचा चुना’


पाचोरा : तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील एका घरातून चोरट्याने पाहुणा असल्याची बतावणी करून तब्बल पाच लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली.

अज्ञात चोरटा म्हणाला ; मी तर यांच्याकडे आलो पाहुणा म्हणून
पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील एकनाथ माणिक मगर (५०) हे आपल्या कुटुंबीयांसह शेतात कामासाठी गेले होते तर त्यांची १५ वर्षाची मुलगी ही शाळेत गेली असल्याने त्यांनी घराची चावी निर्णयाप्रमाणे घराबाहेर ठेवलेली होती. दरम्यान, दुपारी एक वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटा घराची चावी शोधत असतांना गल्लीत राहत असलेल्या वयोवृद्ध महिलेने त्यास तू कोण आहेस ? व घर का उघडतो आहेस ? अशी विचारणा केली असता त्याने मी त्यांच्या घरी पाहुणा आलो आहे, असे सांगितले. यामुळे त्या महिलेने त्याला पुन्हा विचारणा केली नाही. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन कपाट उघडून कपाटातील पाच लाख रुपये घेऊन पसार झाला. दरम्यान, कपाटाचा आवाज येत असतांना म्हातारीने पुन्हा त्यास टोकले. त्यावर चोरट्याने एकनाथ मगर हे घरी आल्याचे सांगून तो घटनास्थळावरून पसार झाला. यानंतर दुपारी दोन वाजता मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर ती दरवाजा व कपाट उघडे पाहून भयभीत होऊन गावातील मंडळींना सांगितले. त्यावेळी नागरीकांनी एकनाथ मगर यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. चोरट्याला घराची चावी व कपाटाची चावी कोठे ठेवतात ? हे माहित असावे याचा अर्थ तो गावातील अथवा जवळील असावा ? असा कयास लावण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय माळी हे करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !