सरपंचावर शौचालय बांधण्यावरून हल्ला : तिघांविरोधात गुन्हा
चाळीसगाव : तालुक्यातील पिंप्री बु.॥ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी स्वच्छता सुरू असताना अचानक सरपंचावर तिघांनी हल्ला चढवत जबर मारहाण केली. या प्रकरणी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घरासमोर शौचालयाला विरोध
तालुक्यातील पिंप्री बु.॥ ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील हे सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी जेसीबीच्या सहाय्याने 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास साफसफाई करीत होते. त्यावेळी अनिल भानुदास पाटील, संदीप भानुदास पाटील व हर्षल दिलीप पाटील हे त्याठिकाणी येऊन घरासमोर शौचालय बांधू देणार नाही, असे सांगून सरपंच सचिन पाटील यांच्यावर हल्ला चढवत विटांनी जबर मारहाण केली. यात सरपंच यांच्या डोक्याला जबर दुखापती झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस स्थानकात वरील तिघा संशयीतांवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास संजय पाटील करीत आहे.




