जळगावात धूम स्टाईल मोबाईल लांबवले : त्रिकूट जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : जळगाव शहरातील पायी जाणाऱ्या नागरिकांच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या तीन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार, १९ डिसेंबर रोजी दुपारी अटक केली आहे. या प्रकरणी तिघांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गोपनीय माहितीवरुन तिघे जाळ्यात
जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरीकांच्या हातातून मोबाईल हिसकावून पळून जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तिघांच्या टोळीबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने आरोपींना अटक केली. नितीन दत्तू पाटील (रा. शिव कॉलनी), गोविंदा उत्तम गोपाळ व विकास लहू गोपाळ *दोन्ही रा. साने गुरुजी कॉलनी, रामानंदनगर परीसर जळगाव) या तिघांना शहरातील साने गुरुजी कॉलनी परीसरातून पथकाने अटक केली.




यांच्या पथकाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख बागुल, पोलीस नाईक बैसाने, विजय पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील, पंकज शिंदे, दीपक शिंदे, हेमंत पाटील यांनी केली. संशयित आरोपी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व नागरीकांकडून हिसकावले ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले. पुढील कारवाईसाठी तिघांना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान यातील संशयित आरोपी नितीन पाटील यांच्यावर यापुर्वी नाशिक आणि रामानंदनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
