गांजा तस्करी प्रकरण : आरोपी नंदू बेलदारच्या लग्नातून आवळल्या मुसक्या
अमळनेर : अमळनेर पोलिसांनी शनिवारी रात्री कासोदा येथे लग्नसमारंभातून गांजा तस्करी प्रकरणात नंदू बेलदार (रा.वनकोठे, ता.एरंडोल) याला अटक केली. कोट्यवधी रुपयांच्या गांजा तस्करीत मुंबई एनसीबीच्या पथकाने गेल्या महिन्यातच बेलदारची चौकशी केली होती तर अमळनेर पोलिस ठाण्यात 28 जानेवारी 2021 रोजी दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न
पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, मिलिंद भामरे, सुनील हटकर, अमोल पाटील, राहुल पाटील, नीलेश मोरे, सूर्यकांत साळुंखे, किशोर पाटील, सुनील पाटील यांच्या पथकाने कासोदा गावात सुरू असलेल्या एका लग्नसमारंभातून बेलदारला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांशी झटापट केली. बेलदारला अमळनेर येथे घेऊन येत असताना रस्त्यात पोलिसांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न झाला; परंतु पोलिसांनी सुरक्षितपणे त्याला अमळनेर येथे घेऊन येत अटकेची कारवाई केली. बेलदारला अटक झाल्याने मोठ्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या शिवाय मुंबईच्या एनसीबी पथकाची बेलदारवर नजर होती. त्याची कसून चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.




