वाळू तस्करांची मुजोरी : पोलिस ठाण्याच्या आवारातून डंपर पळवले
एरंडोल : तालुक्यातील कासोदा पोलिस स्थानकाच्या आवारात जप्त करण्यात आलेले डंपर वाळू तस्कराने पळवून नेले. या प्रकरणी दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
डंपर पळवल्याने उडाली खळबळ
कासोदा परीसरातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांनी रविवार, 19 डिसेंबर रोजी डंपर (एम.एच.20 सी.टी.9284) वर कारवाई केली होती. या डंपरमध्ये तीन ब्रास वाळू होती शिवाय चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने गिरणा नदीतून वाळू चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी डंपर चालक गगन छगन तडवी (रा.उत्राण) याच्यासह डंपर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणला. पोलिस स्थानकात तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असतानाच तडवीचा सहकारी अमीन हुसेन शेख (रा.उत्राण) याने थेट पोलिस ठाण्यातून डंपर पळवला व डंपरमधील वाळू तळई रोडवरील सत्कार हॉटेलच्या समोरील बेकरीच्या मागे खाली केली. यानंतर डंपर सोडून पळ काढला. या प्रकरणी गगन छगन तडवी आणि अमीन हुसेन शेख या दोघांविरुद्ध कासोदा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक नरेश ठाकरे तपास करत आहेत.




