सात वर्षीय बालिकेवर आधी अत्याचार नंतर केला खून


सणबूर : सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची संतापजनक घटना पाटण तालुक्यातील रुवले-सुतारवाडी येथे बुधवारी दुपारी उघडकीस आली. डोंगरातील झाडाझुडपात बालिकेचा मृतदेह टाकून देण्यात आला. ढेबेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी संतोष थोरात (रा. रुवले) यास अटक केली आहे.

जंगलात केला अत्याचार
आरोपी संतोष थोरातने बुधवारी दुपारी अल्पवयीन मुलीस रानात वैरण आणण्यासाठी नेले होते. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला तसेच गळ्यावर पाय देऊन त्याने तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह डोंगरातील झाडाझुडपात टाकून तो घरी आला. सायंकाळी घरातील लोकांनी मुलगी घरी आली नाही, म्हणून शोधाशोध केली. मात्र ती सापडली नाही. ग्रामस्थांनी शेतात शोध घेऊनही ती सापडली नाही. म्हणून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना संतोष थोरात याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

सीसीटीव्हीवरून गुन्ह्याचा उलगडा
पोलिसांनी गावातील नथुराम सुतार यांनी घरावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तपासणी केली असता आरोपी त्या अल्पवयीन मुलीला घेवून गेल्याचे दिसून आल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला. त्यानंतर मुलीला ज्या ठिकाणी मारुन टाकले होते ते ठिकाण दाखवले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी कराड येथील रुग्णालयात पाठविला. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !