बोरखेडा हत्याकांडाचा तपास लावणार्या अधिकार्यांचा सन्मान
रावेर : महाराष्ट्राभर गाजलेल्या बोरखेडा हत्याकांडाचा तपास लावणार्या आयपीएस अधिकार्यांसह रावेरचे पोलिस निरीक्षक व पोलिस हेड कॉस्टेबल यांचा राज्याचे पोलिस महासंचालक (सीआयडी) तर्फे सत्कार करण्यात आला तसेच दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. अधिकार्यांच्या सत्कारानिमित्त महाराष्ट्राभर जळगाव पोलिस विभागाचाही (jalgaon police) सन्मान झाला आहे.
हत्याकांडामुळे गाजले होते प्रकरण
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चौघा अल्पवयीन भावंडांची हत्या करण्यात आली होती तर त्यापैकी मोठ्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना देशभर गाजली होती. या गुन्ह्याचा वस्तुनिष्ठ तपास करून आरोपींना बेड्या घालणार्या तीन पोलिस अधिकारी व एका हवालदाराचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी गौरव केला. त्यावेळी घटनेचे गांभीर्य बघुन तत्कालीन गृहमंत्री अनिल देखमुख यांनी रावेरात घटनास्थळी भेट दिली होती. याबाबत 2020 मध्ये रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण बोरखेडा हत्याकांड म्हणून राज्यभरात चर्चेत आले होते.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केली होती शिफारस
गुन्ह्याचा सर्वात उत्कृष्ट तपास केल्याकामी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी तपासी अंमलदार सहाय्यक पोलिस अधीक्षककुमार चिंथा तसेच जळगाव गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बापू रोहोम, रावेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक व हवालदार बिजु फत्तु जावरे यांची शिफारस केली होती. त्याची दखल घेत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस महासंचालक (पुणे) यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, निरीक्षक बापू रोहोम व रावेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक व हवालदार बिजु फत्तु जावरे यांचा सन्मान करीत त्यांना एकत्रीत रोख दहा हजारांचे पारीतोषिकही दिले.


