‘मल्हार हेल्प फेअर’ ; कोअर कमिटीची पहिल्या बैठकीत नियोजनावर चर्चा


जळगाव : गेल्या तीन वर्षांपासून जळगावकरांना सेवाव्रती संस्थांशी ओळख करून देणारे ‘मल्हार हेल्प फेअर’ येत्या 12 मार्चपासून पुन्हा एकदा आयोजित करण्यात येत आहे. याच अनुषंगाने हेल्प फेअर कोअर कमिटीची पहिली बैठक बुधवारी मेहरूण तलाव येथील मल्हार कम्युनिकेशन्स येथे संपन्न झाली. बैठकीत हेल्प फेअर-4 चे नियोजन व इतर अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर संक्षिप्त चर्चा करण्यात आली. यावेळी कोअर कमिटीचे भरत अमळकर, अमर कुकरेजा, प्रकाश चौबे, गनी मेमन, नंदू अडवाणी, रत्नाकर पाटील, चंद्रशेखर नेवे, प्रशांत मल्हारा, आनंद मल्हारा व इतर सदस्य उपस्थित होते.

12 ते 14 दरम्यान सागर पार्कवर आयोजन
विविध सेवाभावी संस्था, सेवामहर्षींना एकाच मंचावर आणून त्यांच्या निःस्वार्थ कार्याला कौतुकाची थाप देणारे हेल्प फेअर हे एक आगळेवेगळे माध्यम आहे. सन 2018 पासून आयोजित होणार्‍या हेल्प फेअरने अवघ्या 3 वर्षांच्या प्रवासात आजवर अनेक उद्दिष्ट मिळवले आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हेल्प फेअरच्या आयोजनात खंड पडला होता मात्र यावर्षी सर्व नियमांचे पालन करून 12, 13 व 14 मार्च रोजी शहरातील सागर पार्क मैदानावर पुन्हा हेल्प फेअर-4 आयोजित करण्यात येणार आहे. हेल्प फेअर-4 चे यशस्वीरीत्या नियोजन होणे, यावर्षी होणारे हेल्प फेअर अधिक व्यापक, अधिक सर्वसमावेशक करणे याकरीता ही बैठक घेण्यात आली. यावेळी हेल्प फेअर मध्ये सहभाग घेणार्‍या सामाजिक संस्थांच्या निवडीचे निकष, प्रमुख पाहुण्यांचे व्याख्यान, संस्था चालकांसाठी आयोजित 2 दिवसीय कार्यशाळा, विविध क्षेत्रातील सेवाव्रतींचा पुरस्कार देऊन सन्मान, हॉबी क्लासेसचा सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महिला बचत गट संचलित फूड स्टॉल्स, इ. अशा अनेक मुद्यांवर संक्षिप्तपणे चर्चा करण्यात आली. यावेळी कोअर कमिटीच्या सदस्यांनी आपापले विचार मांडले व हेल्प फेअर-4 चा आराखडा तयार केला.






‘समाजसेवा व रोजगार निर्मिती’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
हेल्प फेअरमध्ये सहभाग घेणार्‍या सामाजिक संस्था व सेवा महर्षींसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी करावी या विषयावर मार्गदर्शन व चर्चा होणार असून याचा कार्यशाळेत उपस्थित सर्वांना नक्कीच फायदा होणार आहे. यंदा होणार्‍या हेल्प फेअर मध्ये जिल्ह्याबाहेरील सामाजिक संस्थांचा देखील सहभाग असणार आहे.

हॉबी क्लासेसचा प्रथमच सहभाग
यावर्षी होणार्‍या हेल्प फेअर-4 मध्ये प्रथमच हॉबी क्लासेसचा देखील सहभाग असणार आहे. स्वतःतील विविध छंद ओळखून, त्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्वरूप कसे द्यावे या उद्द्येशाने कार्यरत विविध हॉबी क्लासेस, प्रशिक्षक व कलाकारांचा एक स्वतंत्र विभाग यावेळी असणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी-पालक व हॉबी क्लासेस यांचा परिचय होणार असून याचा दोघांनाही फायदा मिळणार आहे. यासाठीची नावनोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून हेल्प फेअर टीमशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !