कचरा जमा करणार्‍या घंटा गाडीत बालकाचा मृतदेह आढळला : अमळनेरातील घटना


अमळनेर : अमळनेर महापालिकेच्या कचरा जमा करणार्‍या घंटा गाडीत नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने अमळनेर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात महिलेचा शोध सुरू
अमळनेर नगरपालिकेच्या घंटागाडीवर फिरोज समसोद्दिन खाटीक (45, रा. लक्ष्मी टाकी जवळ, गांधलीपुरा) हे चालक म्हणून काम पाहतात. शनिवार, 19 मार्च रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास शहरातील वॉर्ड क्रमांक 8 येथील सम्राट कॉलनी, द्वारका नगर, बोरसे गल्ली, रामकृष्ण कॉलनी या परिसरातून फिरोज खाटील हे घंटागाडीतून ओला व सुखा कचरा जमा करून नगरपालिकेच्या टेकडीवरील कचरा डेपो येथे गाडी खाली केली. त्यावेळी कचरा डेपोवर काम करणार्‍या महिलांना एका कागदात आणि प्लास्टिकच्या पिशवीत पुरूष जातीचे नवजात अर्भक मयत स्थितीत आढळून आला. हा प्रकार पाहून महिलांना धक्का बसला. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या अधिकार्‍यांना व चालक फिरोज खाटीक यांना देण्यात आली. त्यांनी कचरा डेपो येथे धाव घेतली.

अमळनेर पोलिसांची धाव
त्याचप्रमाणे अमळनेर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी घंटागाडीचे चालक फिरोज खाटीक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सुनील हटकर करीत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !