किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी चाळीसगावात सेनेचा रस्ता रोको : सोमय्यांचा पुतळाही जाळला
चाळीसगाव : आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली भारतीय लोकांना भावनिक आव्हान करून त्या नावाने कोट्यवधींचा निधी जमा करून त्याचा गैरवापर करून निधी राजभवनात न जमा करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरणार्या किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसह शिवसेनेचे प्रवक्ते ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आकस बुद्धीने खोटेनाटे आरोप करून ईडी या तपास यंत्रणेचा बाहुल्यासारखा वापर करणार्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ चाळीसगाव शहरात किरीट सोमय्या यांचा पुतळा जाळण्यात आला.
आंदोलकांनी रोखला मार्ग
केंद्र सरकार करीत असलेल्या गैर प्रकाराचा निषेध म्हणून गुरुवारी चाळीसगाव शिवसेनेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी भ्रष्टाचारी किरीट सोमय्या यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला . यावेळी चाळीसगाव शहर व तालुक्यातील शिवसेनेचे शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





