चोरीच्या आठ मोबाईलसह चोरटा जिल्हा पेठ पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : शहरातील नवीन बसस्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या खिश्यातून 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने लांबवला होता. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी सुरज कुमार राम (19, मयाटोला, ता.महाराजपूर, झारखंड) यास अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
शर्टाच्या खिशातून लांबवला मोबाईल
अनिल ठाकुरदास चौधरी (53, वृंदावन कॉम्प्लेक्स, राजू नगर, डोंबिवली, वेस्ट कल्याण) हे रेल्वेमध्ये नोकरीला असून मंगळवार, 21 जून रोजी त्यांच्या खाजगी कामासाठी व भुसावळ येण्यासाठी जळगाव येथे शालक सुनील गोविंदा ढाके (कोल्हे नगर, जळगाव) यांच्याकडे मुक्कामाला होते. बुधवार, 22 जून रोजी भुसावळ येथे जाण्यासाठी अनिल चौधरी सकाळी नऊ वाजता जळगाव नवीन बसस्थानकात आले असता भुसावळ बसमध्ये गर्दीतून चढत असताना त्यांच्यामागे अनोळखी व्यक्तीने त्यांना धक्का मारला आणि त्याच्या शर्टाच्या खिशातील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. अनिल चौधरी यांनी आरडाओरड केली असता मोबाईल हिसकावणारा चोरटा पसार झाला. सायंकाळी सात वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून अटक
जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख, जुबेर तडवी, अमित मराठे यांनी गोपनीय माहितीनुसार, संशयीत आरोपी सुरज कुमार राम (19, मयाटोला, ता.महाराजपूर, झारखंड) याला नवीन बसस्थानक आवारातून अटक करण्यात आली. संशयीताकडून चोरीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले. दरम्यान, आरोपीसोबत असलेल्या साथीदारांचा देखील शोध सुरू आहे.
विरावली शिवारात वीज कोसळून महिला ठार
