Clerk in police custody along with Naib Tehsildar of Bhusawal भुसावळातील नायब तहसीलदारांसह क्लर्क पोलिस कोठडीत
शहरातील 14 व्यवहार संशयाच्या भोवर्यात : भूमाफियाच्या वाढल्या अडचणी
Clerk in police custody along with Naib Tehsildar of Bhusawal भुसावळ : तहसीलदारांच्या बनावट आदेशाने प्लॉट विक्री प्रकरणात भुसावळ शहर पोलिसांनी भुसावळचे नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व क्लार्क शाम तिवारी यांना यांना रविवारी दुपारी अटक केली होती. संशयीतांना सोमवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात न्या.जंगम स्वामी यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता संशयीतांना 4 ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे नेमके प्रकरण
भुसावळातील जनकल्याण अर्बन संस्थेचे विशेष वसूली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांची बनावट सही व शिक्का याचा वापर करीत संस्थेचे दहा प्लॉट परस्पर विक्री केल्याची बाब उघड झाल्यानंतर धांडेसह संस्थेचे प्लॉट घेणार्या दहा जणांविरूध्द येथील शहर पाोलिस ठाण्यात रविवार, 17 जुलै रोजी हा दाखल करण्यात आला होता. मुख्य संशयीत व वसुली अधिकारी रवींद्र धांडे यास अटक करण्यात आल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. गुन्हा घडला त्यावेळी नायब तहसीलदारांकडे अतिरीक्त कारभार असताना धांडे यांनी तहसीलदारांच्या पत्राबाबत भूषण बेंडाळे याला काम सोपवले होते तर बेंडाळे याने नायब तहसीलदार इंगळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर इंगळे यांनी आदेश करण्याच्या सूचना शाम तिवारी यांना दिल्या. यामुळे तिवारी यांनी इंगळेंच्या सांगण्यानुसार पत्र तयार करून दिल्याची बाब पोलिसांच्या चौकशीत उघड झाली.

‘त्या’ 14 व्यवहारांची होणार चौकशी
तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्क्याचा वापर करून जमीन विक्री प्रकरणात साक्षीदारांच्या जवाबानंतर पोलिसांना अशा पद्धत्तीने 14 व्यवहार झाल्याची माहिती पुढे आली आहे. या व्यवहारांमध्ये अनियमितता आहे की हे व्यवहार कायदेशीर आहे याबाबतचा पोलिसांकडून आता बारकाईने तपास सुरू असून हे व्यवहार बेकायदेशीर असल्यास मूळापर्यंत जावून तपास केला जाईल व दोषी कुणीही असो त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
पोलिस चौकशीत अनेक बाबींचा होणार उलगडा
अटकेतील नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व क्लार्क शाम तिवारी यांना न्यायालयाने सोमवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यात संबंधितानी अशा पद्धत्तीने किती जणांचा पत्र दिले, त्यात त्यांचा सहभागाची नेमकी भूमिका कशी राहिली? यासह अनेक मुद्यांचा उलगडा होणार आहे. संशयीत आरोपींतर्फे अॅड.जगदीश कापडे तर सरकारतर्फे अॅड.अनिल चुकेवाढ यांनी काम पाहिले. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील एक सूत्रधार हा शहरातील उच्चभू्र भूमाफिया असून त्याची चौकशी पोलिसांकडून कधी केली जाते याकडे लक्ष लागले आहे. जागा विक्री करण्याच्या प्रकरणात या भूमाफियाचा महत्वाचा रोल असल्याची शहरात चर्चा आहे. यामुळे पोलिसांच्या तपासाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
