फवारणी करताना विषबाधा झाल्याने तरुणाचा ओढवला मृत्यू : जिल्ह्यातील या गावातील घटना
Varkhedi Youth Died Of Poisoning During Field Spraying पाचोरा : तालुक्यातील वरखेडी येथील तरुणाचा शेतात पिकांवर औषधाची फवारणी करत असतांना विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वरखेडी शिवारात घडली. या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली. अविनाश अशोक भोई (28, वरखेडी, ता.पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
विषारी औषध फवारणी करताना दुर्घटना
अविनाश भोई हा तरुण वरखेडी शिवारात एक एकरावरील आपल्या शेतात रविवार, 30 जुलै रोजी पिकांवर फवारणी करीत होता मात्र त्याचवेळी विषारी औषधाने त्यांना भुरळ आल्याने तो बेशुद्ध झाला. ग्रामस्थांच्या मदतीने अविनाश भोई यास तत्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता मृत्यूशी झुंज देत असतांनाच सोमवार, 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
अविनाश हा त्यांच्या कुटुंबियातील कर्ता युवक असल्याने त्याच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत अविनाश भोई याच्या पश्चात वृद्ध आई, वडिल, तीन बहिणी असा परीवार आहे.
