Gulabrao Patil along with Girish Mahajan took oath as minister गिरीश महाजनांसह गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
मुंबई : राज्यातील शिंदे सरकारमधील मंत्री मंडळ विस्ताराला मंगळवार, 9 रोजीचा मुहूर्त लाभल्यानंतर पहिल्या विस्तारात कुणाला संधी मिळणार ? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्यात जळगाव जिल्ह्यातून जामनेरचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन तसेच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांचा संधी मिळाली आहे. उभयंतांनी राजभवनात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
40 दिवसानंतर मंत्री मंडळाचा विस्तार
शिंदे सरकारचा मंत्री मंडळ विस्तार मंगळवारी झाला. यात भारतीय जनता पक्षातर्फे गिरीश महाजन यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. महाजनांची मंत्री पदी वर्णी लागताच जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.


सलग सहा वेळा निवडून येण्याचा विक्रम
महाजन हे 1995 पासून सातत्याने विधानसभेवर निवडून येत आहेत. ते सहा वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. यानंतर महाविकास आघाडीमुळे मधली अडीच वर्षे ते सत्तेबाहेर होते. आता मात्र त्यांची पुन्हा एकदा सत्तेत वापसी झाली आहे.
गुलाबराव पाटलांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ
शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली असून मंत्री म्हणून त्यांचा हा तिसरा तर कॅबिनेट मंत्री म्हणून दुसरा शपथविधी आहे.
तिसर्यांदा मंत्री पदाची शपथ
गुलाबराव पाटील हे आपल्या राजकीय कारकिर्दीत तिसर्यांदा मंत्री बनले आहेत. जुलै 2016 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत ते सहकार राज्यमंत्री होते. यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते 30 जूनपर्यंत पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. आता त्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटातर्फे जिल्ह्यात जल्लोष
दरम्यान, गुलाबराव पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यात ठिकाठिकाणी शिंदे गटातर्फे जल्लोष करण्यात आला. गुलाबभाऊंना लवकरच कोणते खाते मिळणार ते स्पष्ट होणार आहे.
आतापर्यंत यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
राधाकृष्ण विखे पाटील
सुधीर मुनगंटीवार
चंद्रकांत पाटील
विजयकुमार गावीत
गिरीश महाजन
गुलाबराव पाटील
सुरेश खाडे
संदीपान घुमरे