Srirampur Police Inspector Sanjay Sanap has finally been suspended श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांचे अखेर निलंबन
Srirampur Police Inspector Sanjay Sanap has finally been suspended श्रीरामपूर : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांचे निलंबन करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. कुख्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल करून घेण्यास उशीर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, तालुका पोलीस ठाण्यातील निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्याकडे श्रीरामपूर शहर ठाण्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला असून त्यांनी तो स्वीकारला आहे.
नेमके असे आहे प्रकरण
शहरातील कुख्यात आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर (35) याने 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तीन वर्षांपूर्वी शाळेतून पळून नेत तिचे धर्मांतर केले व निकाह केला, जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले होते त्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती झाली. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार केल्या होत्या मात्र याप्रकरणी फिर्याद दाखल करून घेण्यास विलंब करण्यात आला व पीडीतेच्या पालकांनी उपधीक्षक संदीप मिटके यांच्याशी संपर्क साधल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.

दोषी आढळताच निलंबन कारवाई
पीडीतेच्या पालकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील व महानिरीक्षक शेखर यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर पाटील यांनी उपधीक्षक मिटके यांना चौकशीचे आदेश दिले. मिटके यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत सानप हे दोषी आढळले होते. हा अहवाल मिटके यांनी पाटील यांच्याकडे व त्यानंतर तो विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. याप्रकरणी शेखर यांनी सानप यांच्यावर फिर्याद घेण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना दिले. त्यानुसार पाटील यांनी सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली.
तक्रार मागे घेण्यासाठी दबाव कर्मचार्याला भोवला
या कालावधीत सानप यांची विभागीय स्तरावर चौकशी होईली तर तीन दिवसांपूर्वीच याच प्रकरणात फिर्यादी पक्षावर फिर्याद मागे घेण्याबाबत नेहमीच दबाव आणल्याप्रकरणी गुन्हे शाखेतील कर्मचारी पंकज गोसावी याला निलंबित करण्यात आली व ही बातमी ताजी असतानाच आता सानप यांना निलंबीत करण्यात आले.
