भुसावळात शाडू मातीच्या गणपती मूर्ती कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ : आगामी गणेशोत्सवात मुलांच्या बालमनावर पर्यावरण संरक्षणाची बीजे रोवण्यासाठी प्रतिष्ठा महिला मंडळ, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, सोनिच्छा ड्रॉईंग क्लास व इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संतोषीमाता हॉलमध्ये नुकतीच शाडूमातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा निःशुल्क आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यांची होती उपस्थिती
या कार्यशाळेला मुख्य अतिथी म्हणून आमदार संजय सावकारे तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे सहायक प्रांतपाल विकास पाचपांडे उपस्थित होते.खिरोदा येथील सप्तपुट ललित कलाभवन विद्यालयाचे प्राचार्य अतुल मालखेडे यांनी मुलांना साध्या सोप्या पद्धतीने मूर्ती बनविण्यास शिकवले. या कार्यशाळेला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यशाळेत 327 मुलांनी आपला सहभाग नोंदविला. सर्वप्रथम मुलांना लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा व गणेश मूर्ती ही पाण्यात विरघळणारी व जलप्रदूषण न करणारी असावी हे समजावून सांगण्यात आले. आमदार संजय सावकारे यांनी मुलांनी स्वतः तयार केलेली मूर्तीचीच घरात स्थापना करावी असे आवर्जून सांगितले. मुलांनी स्वतः तयार केलेली मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्कृष्ट पर्यावरण पूरक आरस करणार्‍या मुलांना रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे विशेष बक्षीस मिळतील, असे जाहीर करण्यात आले.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
मूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे देण्यात आली. मुलांना रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे खाऊ वाटप करण्यात आला. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या रजनी सावकारे यांनी नियोजन केले तर राजश्री देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी सोनिच्छा ड्रॉईंग क्लासच्या संचालिका व मंडळाच्या सदस्या जयश्री चौधरी, ज्योती राठोड अनिता आंबेकर, मनीषा काकडे, लता सोनवणे, रोटरीचे प्रकल्प प्रमुख संदीप जोशी, हरमीत माखन, रोटरी सदस्य तेजस नवगाळे, पुरुषोत्तम पटेल, मंगेश यावलकर, इनरव्हील अध्यक्षा प्रतीक्षा पाटील, मोना भंगाळे, रेवती मांडे, डॉ.किर्ती चांदवडकर, अंजली जोशी यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !