विद्यार्थ्यांना संशोधनाची दिशा दाखवणार्‍या प्रा.डॉ.शुभांगी दिनेश राठी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त


भुसावळ : गुरुवर्य, मार्गदर्शक, उत्तम प्राध्यापक, उत्कृष्ट वक्त्या व आवडत्या शिक्षक तथा भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्रा.शुभांगी राठी या आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्या. आपण खरोखरच माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना संशोधनाची दिशा देण्यात आपले मोलाचे योगदान राहिलेले आहेत. आज सेवापूर्तीच्या निमित्ताने दोन शब्द आपल्याबद्दल मांडण्याची मला तीव्र इच्छा वाटली. त्यातूनच मी आपल्या बाबत माझे विचार आपणांसमोर ठेवत आहे. कारण गुरु काय असावा याचे मॅडम ह्या एक उत्तम उदाहरण आहे.

आपल्या भूमिकेला नेहमीच दिला न्याय
प्रा.डॉ.शुभांगी दिनेश राठी या राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून श्रीमती प. क. कोटेच्या महिला महाविद्यालय भुसावळ येथे गेल्या 36 वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या या प्रवासात अविरत शिक्षक, मार्गदर्शक व उत्तम गुरू म्हणून वेळोवेळी सकारात्मक मार्गदर्शन केलेले आहे. प्रा.राठी या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद येथून एम.ए. राज्यशास्त्रात चान्सलर गोल्ड मेडलिस्ट होत्या तसेच मॅडम यांनी विद्या परीषद उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सदस्य म्हणूनही आपली भूमिका ठाम उमटविली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळाच्या त्या अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांच्या कामातून राज्यशास्त्र विषयाला मोलाची दिशा त्या काळात मिळाली होती. तसेच आपल्या विद्यापीठाच्या स्त्री अध्ययन अभ्यास मंडळात सदस्य म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आपल्या विद्यापीठाच्या स्थायी समिती सदस्य व माजी सल्लागार समिती सदस्य म्हणून आयडियल विभागात देखील कर्तव्य पार पाडले आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्या परीषदेकडून एच.एस.सी. व एस.एस.सी.बोर्डावर देखील त्यांची निवड झाली होती. त्यातदेखील त्यांनी आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे.

प्रा.राठी उत्तम पीएचडी मार्गदर्शक
प्रा.राठी या उत्तम पीएच.डी.मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थ्यांनी पीएचडी केली आहे तसेच पाच विद्यार्थी पीएचडी करत आहेत तसेच संशोधनात त्यांनी 55 पेक्षा अधिक रीसर्च पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सादर केलेले आहेत तसेच त्यांनी आपल्या 23 पेक्षा अधिक पुस्तकांद्वारे राज्यशास्त्र विषयाला मोलाचे असे योगदान दिलेले आहे. या विविध भूमिका यशस्वी पार पाडण्यावरून त्यांचा स्वभाव लक्षात येतो. केवळ यावरूनच नाही तर व्यक्तिमत्त्वाचा परिचय हा त्यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपसूकच होतो.

अनेक विद्यार्थी घडविले
प्रा.राठी यांच्या मार्गदर्शनाने माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. माझा संशोधनाचा पिंड घडवत असताना विविध संशोधन पूरक सूचनांद्वारे मला अनमोल मार्गदर्शन केले. प्रा.राठी यांनी इतर विद्यार्थ्यांना संशोधनात उत्तम, असे मार्गदर्शन केलेले आहे. संशोधनाची दिशा, संशोधनाचा हेतू, उद्दिष्टे, संशोधनाचा रोड मॅप अशा संशोधनाशी संबंधित विविध समस्यांवर यांच्याकडे उत्तर असायचे. माझ्या मार्गदर्शक म्हणून ज्याही वेळेस मी त्यांच्या संपर्कात आलो त्यावेळेस कधीही निरुत्साही किंवा कामाबाबत टाळाटाळ करण्याची त्यांची प्रवृत्ती दिसली नाही. प्रत्येक समस्येवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून धडाडी व चिकाटीचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांच्यातील ही संघर्ष प्रवृत्ती खरोखरच अनुकरणीय आहे.

राज्यशास्त्रामुळे कठीण काम झाले सोपे
प्रा.डॉ.शुभांगी दिनेश राठी यांचे पती भुसावळातील ख्यातनाम प्राध्यापक, सी.ए., नगरसेवक दिनेश राठी आहेत. प्रा.राठी यांनी आपला राज्यशास्त्र विषय केवळ सैद्धांतिकच अभ्यासला नाही तर त्याला प्रत्यक्षात देखील उतरविला आहे. त्याचे उदाहरण म्हणजे नगरसेवक असलेले पती. कारण बर्‍याच वेळेस प्रा.दिनेश राठी सरांशी बोलताना त्यांचा थिंक टँक सारखा उल्लेख करताना दिसले. कारण सरांच्या नगरसेवक पदापर्यंतच्या यशामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा प्रा.राठी यांचा होता. प्रचार प्रसार करत असताना महिलांपर्यंत प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे काम त्यांनी केले. त्यावेळेस बोलताना सांगतात, राज्यशास्त्र विषय शिकविणे आणि प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेणे यात वेगळाच आनंद मला मिळाला. निवडणूक प्रचारात प्रचंड संघर्ष असताना देखील राज्यशास्त्र विषय असल्यामुळे हे कठीण काम देखील मला सोपे वाटले. असा मॅडमांचा प्रत्येक प्रसंगामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा स्वभाव आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सदैव मार्गदर्शन ठरणारा आहे. प्रा.राठी या अशाच आपण सदैव मार्गदर्शक, उत्तम शिक्षक, गुरुवर्य या भूमिकेत राहाव्या व आपले भावी आयुष्य सुख, समृद्धीचे व आनंदाचे जावो या शुभेच्छा देऊन थांबतो.

आपला विद्यार्थी-
डॉ.आर.एस.नाडेकर
पी.ओ.नाहाटा महाविद्यालय, भुसावळ


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !