ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुकीत मालोदचे चार अर्ज अवैध
परसाडे बुद्रुकचे सर्वच अर्ज ठरले वैद्य : माघारी नंतर लढतीचे चित्र होणार स्पष्ट
यावल : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीत मालोद ग्रामपंचायतीतील चार अर्ज छाणणीत अवैध ठरले आहे तर परसाडे बुद्रुकचे सर्वच अर्ज वैध ठरले. आता मंगळवारी माघारी नंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. छानणी दरम्यान उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेल्या हरकतीवर सायंकाळपर्यंत सुनावणी चालली होती.
चार अर्ज ठरले अवैध
मालोद व परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत दाखल उमेदवारी अर्जांची तहसील कार्यालयात छानणी करण्यात आली. यात मालोद ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2, 3 व 5 मध्ये दाखल उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या. यात सायंकाळपर्यंत सुनावणी चालली यात सुनावणी अंती चार उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले तर दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरीता दाखल 17 अर्ज वैध ठरले. मालोद सरपंच पदाकरीता 9 अर्ज असून पाच प्रभागातील 13 जागेसाठी 31 अर्ज आहेत. त्याचप्रमाणे परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीत सरपंच पदाकरीता 8 अर्ज तर तीन प्रभागातील नऊ जागांसाठी 31 अर्ज आहेत. आता माघारीकडे लक्ष लागले आहे. माघारीकरीता मंगळवार, 06 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत आहे.
दोन्ही ग्रामपंचायतीत माघारीकरीता मंगळवार, 6 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत असून माघारीनंतर दुपारी तीन वाजेनंतर चिन्ह वाटप तर रविवार, 18 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान तर सोमवार, 19 सप्टेंबर रोजी यावल तहसील कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होईल.


