यावल पोलिस वसाहतीतील वाहने न हटवण्यास आमरण उपोषण
कर्मचार्यांच्या कुटुंबियांचा तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा
यावल : यावल पोलिस वसाहतीच्या आवारात गेल्या अनेक वर्षापासून महसूल विभागा कडून जप्त केलेली गौण खनिजाची वाहने अस्ताव्यस्त लावलेली असून वाहनाच्या नजीक गवताची वाढ झाल्याने पोलिस वसाहतीतील कुटुंबीयांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याने पोलिस कर्मचार्यांच्या कुटुंबीयांनी येथील तहसीलदार महेश पवार व पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निवेदन सादर केले. परीसरातील वाहने हटवावीत, परीसराची स्वच्छता करून दिल्यास पोलिस कुटुंबीयांकडून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
आरोग्य आले धोक्यात
यावलच्या पोलिस वसाहतीत सुमारे 20 कुटुंब वास्तव्यास आहेत. पोलिस वसाहतीच्या समोर असलेल्या आवारात महसूल विभागाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून जप्त केलेली वाहने लावून ठेवण्यात आली आहेत. या वाहनांच्या आजूबाजूला अनावश्यक वनस्पतीसह गवताची वाढ झाल्याने व सरपटणार्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने रात्री-अपरात्री पोलिस वसाहतीत जाण्यासाठी धोक्यात जीव घालवावा लागत असल्याची समस्या आहे वाहने असता व्यस्त लावली असल्याने व या परीसराची स्वच्छता होत नसल्याने पावसाळ्यात पाण्याचे डबके साचून दुर्गंधी सुटते. पोलिस वसाहतीला संरक्षण भिंत नसल्याने व वेळेवर गटारीची साफसफाई होत नसल्याने डुकरांचा वसाहतीत त्रास वाढला आहे. या सर्व समस्यांचे कथन वसाहतीतील महिलांनी तहसीलदार महेश पवार यांच्याकडे केले.

तत्काळ समस्या सोडवणार
पोलिस निरीक्षक मानगावकर यांनी तातडीने संबंधित विभागाशी व प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन पोलिस कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना दिले.
