‘50 खोके सरकार एकदम ओके’ म्हणत राज्य सरकारचा भुसावळात निषेध
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातेत गेल्याचा निषेध : युवा सेनेची स्वाक्षरी मोहिम
भुसावळ : वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरीत्या महाराष्ट्रात येत असताना “खोके सरकारच्या” बेजबाबदारपणामुळे गुजरात राज्यात गेल्याचा निषेध करीत शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर युवासेनेतर्फे शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ गुरुवार, 15 सप्टेंबर 2022 रोजी निदर्शने करण्यात आली. यावेळी युवा सेनेतर्फे स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.
एक लाख तरुणांचा रोजगार बुडाला
वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरीत्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प हा गुजरातला गेल्याच्या विरोधात राज्यभरात युवासेना रस्त्यावर उतरली आहे. महाराष्ट्रातील एक लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा सुमारे एक लाख 45 हजार कोटींचा हा प्रकल्प “खोके सरकारच्या” बेजबाबदारपणामुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्याच्या निषेधार्थ शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात युवासेनेतर्फे निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

भुसावळातील आंदोलनात यांची उपस्थिती
या निषेध स्वाक्षरी मोहिमेला युवासेना जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा, शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, मुकेश गुंजाळ, तालुका युवा अधिकारी हेमंत बर्हाटे, शहर युवा अधिकारी सुरज पाटील, तालुका उप युवा अधिकारी बबलू धनगर, तालुका उप युवा अधिकारी पवन बाक्से, शहर उप युवा अधिकारी शरीफ तडवी, शहर उप युवा अधिकारी भूषण तायडे, विभाग युवाअधिकारी धीरज सोनवणे, विक्की चव्हाण, भरत बाविस्कर यांच्यासह शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
